महेंद्र सिंग धोनी इज द 'बॉस'; आयपीएलमध्ये माहिच्या नावावर अनोखा विक्रम, चेपॉकवर सन्मान

MS Dhoni's 200th Match as Captain : आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु आहे. गेल्या पंधरा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो. 

Apr 13, 2023, 12:43 PM IST
1/7

आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने आहेत. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर हा सामना खेळवला जातोय, या सामन्यासाठी महेंद्रसिंग धोणी मैदानावर उतरताच त्याच्या नावावर एक मोठा विक्रम जमा झाला आहे. 

2/7

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भूषवणारा तो पहिला खेळाडू ठरलाय. धोणीने चेन्नई संघाच्या 200 सामन्यात कर्णधारपद सांभाळलंय. याशिवाय धोणीने पुणे सुपरजायंट्स संघाचं नेतृत्वही केलं आहे. 

3/7

धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने 2010, 2011, 2018 आणि 2021 असे चारवेळा जेतेपद पटकावलं आहे. याशिवाय 11 वेळा टॉप चारमध्ये जागा मिळवली आहे. तर पाच वेळा उपविजेतेपदाचा मानही मिळवला आहे. 

4/7

धोणीने आयपीएलमध्ये एकूण 213  सामन्यात कर्णधारपद सांभाळलं आहे. यात त्याने 125 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. तर 87 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलमधल्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी धोणी एक आहे. 

5/7

41 वर्षांच्या महेंद्रसिंग धोणीचा ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून धोणी चेन्नई संघाचं नेतृत्व करतोय. चेन्नईवर दोन वर्ष बंदी आल्यानंतर त्याने पुणे सुपरजायंट्स संघाचं नेतृत्व केलं.

6/7

एमएस धोणीनंतर सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद सांभाळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माचा क्रमांक लागतो. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 146 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यात 80 सामन्यात विजय तर 62 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

7/7

या यादीत विराट कोहलीचा तिसरा क्रमांक लागतो. विराटने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना 140 सामन्यात नेतृत्व केलं आहे. यात आरसीबीने 64 सामन्यात विजय मिळवलाय. तर 69 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय