'शिंदेंना महाराष्ट्राचं नेतृत्व करायला मिळालं याचा मला आनंद, अलीडकच्या 50...'; पवारांकडून कौतुकाचा वर्षाव

Sharad Pawar Praises Eknath Shinde: दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात केलेल्या जाहीर भाषणामध्ये शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...

Swapnil Ghangale | Feb 12, 2025, 08:47 AM IST
1/7

eknathshindedelhiaward

मंगळवारी सायंकाळी नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र सदन भवनामध्ये एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्यात आला.  

2/7

eknathshindedelhiaward

या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं तोंड भरुन कौतुक केलं. "मला आनंद आहे की, एकनाथ शिंदेंचा सत्कार याठिकाणी आहे.  त्यांनी सांगितलं की, ते सातारचे आहेत. एकनाथराव, साताऱ्याने बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहित नसेल मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीभाई कूपर. साताऱ्यात कूपर नावाची एक कंपनी होती. त्याचे मालक जे आता नाहीत ते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते," असं शरद पवार म्हणाले.

3/7

eknathshindedelhiaward

"त्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण झाले व त्यानंतर एकनाथराव झाले. मला त्यांना आठवण करून द्यायचीये, तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव राहिलं. त्या गावाचे नाव नांदवळ आणि त्या गावच्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे शरद पवार!" असं म्हणत पवारांनी आपणही साताऱ्याचे असल्याचं सांगितलं.  

4/7

eknathshindedelhiaward

"मला आनंद आहे की, आज महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल? याप्रकारची काळजी त्यांनी घेतली," असंही शरद पवार म्हणाले.  

5/7

eknathshindedelhiaward

"ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. अलीकडच्या 50 वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण? याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. म्हणून एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं," असं शरद पवार म्हणाले.

6/7

eknathshindedelhiaward

"योग्य दिशा देण्याचं काम करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेऊन राज्य आणि विशेषत: हा नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल? यामध्ये लक्षकेंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं, याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहिल," असं शरद पवार एकनाथ शिंदेंबद्दल म्हणाले.  

7/7

eknathshindedelhiaward

एकनाथ शिंदेंचा सन्मान होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. तो सन्मान कसा होतोय? शिंदे यांचा पुरस्कार! शिंदेंना शिंद्यांचा पुरस्कार! तो ही जावई असलेल्या शिंदेंच्या हातून.. आनंद आहे," असं शरद पवार म्हणाले.