हिंदू जननायक नक्की कोण? शिवसेना नेत्याच्या पोस्टरची राजकीय वर्तुळात चर्चा

 हिंदू जननायक नक्की कोण? यावर अनेक दिवसांपासून शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये पोस्टरबाजी सुरु आहे

Updated: May 13, 2022, 11:45 AM IST
हिंदू जननायक नक्की कोण? शिवसेना नेत्याच्या पोस्टरची राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे : हिंदू जननायक नक्की कोण? यावर अनेक दिवसांपासून शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये पोस्टरबाजी सुरु आहे. सध्या देशात चर्चेत असलेला राज ठाकरेंचा अयोध्या दौरा येत्या 5 जुनला होणार आहे. या पार्श्वभूमीवर 14 मे रोजी मुंबईच्या बी.के. सी मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविराट जाहीर सभेचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये ही पोस्टरबाजी सुरु असताना यामध्ये आता शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उडी घेतली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे एका बॅनरचा फोटो पोस्ट करुन 'चलो मुंबई चलो मुंबई' चा नारा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावासमोर 'हिंदू जननायक' असा उल्लेख केला आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेवर नाराज आहे आणि त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय चर्चा सुरू होत्या. ही सगळी चर्चा सुरू असताना त्यांनी  शिवसेनेबाबत केलेली ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टमुळे नक्की हिंदू जननायक कोण? उद्धव ठाकरे की राज ठाकरे याची चर्चा मात्र आता मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

आढळराव पुन्हा संसदेत जाणार : संजय राऊत

खासदार संजय राऊत मागील आठवड्यात पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी आढळरावांचं होम ग्राऊंड असलेल्या शिरुरमध्ये पत्रकार परिषद घेतली. सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले. आढळरावांचं शिवसेनेसाठीचं काम मोठं आहे. त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा योग्य तो  सन्मान केला जाईल, असंही राऊत म्हणाले होते.