Diwali in Vidarbha : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे. वसुबारसला गाय आणि वासराची पूजा करण्यात येते. दिवाळीचा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातही या सणाचा आनंद पाहिला मिळतो. दिवाळीतील वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा आणि भाऊबीज साजरी करण्यात येते. या सणाला साजरा करताना वेगवेगळी परंपरा आहे. विदर्भात वसुबारसला पांडवांची पूजा करण्याची परंपरा आहे.
इथल्या कृषिप्रधान संस्कृतीचे हे ठळक वैशिष्ट्य आहे. वर्षभर बैलांच्या भरवश्यावर शेती कसली जाते. त्याच बैलांना जन्म देणारी माऊली म्हणजे गाय. त्यामुळे तिची वसुबारच्या दिवशी पूजा केली जाते. पाडस असलेल्या गाईला विशेष महत्व असते. गाईंच्या वाट्याला दिवाळी दोनवेळा येते, एक वसुबारस आणि दुसरी बलिप्रतिपदेला. त्यामुळेच यावर काही चारोळी पण आपण ऐकल्या आहेत.
दिन दिन दिवाळी
गायी, म्हशी ओवाळी
गायी, म्हशी कोणाच्या
राम, लक्ष्मणाच्या...
विदर्भात वसुबारसला सकाळी अंगण झोडून शेणाने सारवलं जातं. मग अंगणात दारासमोर शेणाने पाच पाडव तयार केले जातात. त्यांची दूध किंवा दही भात शिंपडून पूजा केली जाते. संध्याकाळी गाय वासराची पूजा करुन पुरणाचं नैवेद्य दाखवलं जातं. दिवाळीचे पाच दिवस पांडव टाकले जातात. गावांत घरोघरी हे पांडव दिसतात.
बलिप्रतिपदेला गावखेड्यात बळीराजाचे स्मरण केले जाते. शेतकरी या दिवशी बळीराजाप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. गायी, म्हशींना रंगविले जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. पोळ्यासारखा उत्साह या दिवशी गावोगावी दिसून येतात. आजही ही परंपरा पाळली जाते.
विदर्भात भाऊबीजेला चंद्राला अतिशय महत्त्व आहे. भाऊबीज बहीण-भावाचे नाते बळकट करण्याचा हा दिवस. या दिवशी लेकीसुना माहेरी जातात. सायंकाळी आधी चंद्राला मग भावाला ओवाळतात, ही परंपरा आजही पाळली जाते.
त्यासोबत दिवाळीत भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्ह्याचा काही भाग या प्रदेशात झाडीपट्टी नाटकांचा जल्लोष पाहिला मिळतो. ही परंपरा पूर्वीसारखी दिसत नाही. पण आजही हा जल्लोष काही भागात पाहिला मिळतो. या दिवसात हंगामातील पीक हाती आले असतात. त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक हा उत्सव साजरा करतात. यामध्ये झाडीबोलीतील नाटके, दंडार, खडीगंमत अशा लोककलांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाते.