Gudi Padwa 2024 Date : हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडवाच्या सणापासून होते. गुढीपाडवाचा हा सण महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्याचा सण हा मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. खरं तर मराठी महिन्यांनुसार चैत्र महिन्याचा पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सिंधी समाजात हा सण चेटीचंड नावानं ओळखला जातो. (Gudi Padwa 2024 When is Gudi Padwa this year Gudi Padwa Date Puja Vidhi Gudi Padwa Shubh Muhurat Importance in marathi)
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 ला सकाळी 11.50 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024 ला रात्री 8.30 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी 9 एप्रिल 2024 ला साजरा करण्यात येणार आहे.
चैत्र शुद्ध प्रतीपदेपासून श्री शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यांमध्ये प्राण भरुन युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शके मोजण्यास सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय 14 वर्षांच्या वनवसानंतर श्री राम रावणाचा वध करुन अयोध्येत परतले होते. म्हणून विजयोत्सव म्हणून गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा सुरु झाली. धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने यादिवशी सृष्टीची निर्मिती केली होती, असा उल्लेख आहे. अशीच एक आख्यायिका आहे की, या दिवसाचं भगवान विष्णूंनी मस्त्य रुप धारण करुन शंकासुराचा वध केला होता.
सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि नंतर घर, टेरेस किंवा घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते. त्यासाठी बांबू, रेशमी कापड किंवा साडी, हार फुलं, कडुनिंबांच्या पानांनी सजवून गुढीवर तांब्या किंवा चांदीचं भांडं ठेवून गुढी उभारली जाते. घराबाहेर दारावर आंब्याची पानं, रांगोळी, फुलं, तोरण नववर्षाच्या स्वागताची तयारी करण्यात येते. या दिवशी पुरळपोळी, श्रीखंड मोदक आणि आंब्याचा रस हे पारंपारिक पदार्थाचे नैवेद्य दाखवले जाते. त्याशिवाय गुढीपाडव्याचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने यादिवशी नवीन कामाची सुरुवात, नवीन घर, वस्त्र, महागड्या वस्तू, गाडी, सोनं, चांदी खरेदी करण्यात येते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)