हळदी कुंकू स्पेशल : नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकूवाचा समारंभाचे आयोजन करतात. पण तुम्हाला माहितीये का मकर संक्रांतीत हळदी कुंकूवाचा सण का साजरा करतात. पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो. हळदीकुंकू करणे म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असं मानले जाते. यावेळी हळदीकुंकूवाचा सोहळा तुम्ही रथसप्तमी 4 फेब्रुवारीपर्यंत करु शकता.
कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्येतर महिलांकडून आर्य महिलांनी आपल्याकडे घेतली आहे. जेव्हा आपण अतिप्राचीन मातृसंस्कृती पाहतो त्यात लाल रंगाला विशेष महत्त्व पाहिला मिळतं. इ.स. च्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाङमयात कुंकवाचं उल्लेख आहे. रघुवंशात, अमरशतकात, भतृहरीच्या शृंगारशतकात कुंकमतिलकाला विशेष महत्त्व होतं. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचं अनेक धार्मिक ग्रंथात पाहिला मिळते. दुर्गापुजेतही कुंकवाचे आधिक्य अधिक असून सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय होते.
तसंच कुंकू लावण्याच्या प्रथेचा पशुबळीशीही संबंध असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी दिसून येतो. शाक्त उपासनेत देवीच्या कपाळी पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावला जात होता. स्त्री ही जगदंबेची अंशरूप असल्याचं मानलं गेल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रिला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणावयाचं असतं, तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारावयाचं आणि त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करावयाचा, अशी प्रथा दक्षिणेतल्या आर्येतर जातीत पाहिला मिळते.
कुंकू अशाप्रकारे सौभाग्यप्रतीक मानलं जाऊन लागलं. भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर करण्यात येत आहे. स्त्रियांचं कुंकू हे लेणे मानलं गेलं. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झालं आणि लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा इथूनच सुरु झाली. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते आणि म्हणते `तुझे सौभाग्य अक्षय्य राहो'.
त्यानंतर चैत्रगौरीचे चैत्रतीज ते अक्षय्यतृतीयेपर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदीकुंकू आणि संक्रांतीनिमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदकुंकू आजही केलं जातं. शिवाय गौरी, गणपती, नवरात्र या धार्मिक सणांतही काही कुटुंबात सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदीकुंकू करावयाची प्रथा आजही पाळली जाते.
हळदीकुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदीकुंकू समारंभासाठी बोलवता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा. सुहासिनी महिलेला हळदी कुंकू लावला, त्यानंतर तिला अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लीत करा. त्यानंतर तिची बोराने ओटी भरुन सुहासिनी सौभाग्याचे प्रतिक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वाण द्या. वाण देताना पदराचा टोक देऊन ते दिले पाहिजे. तिळगुळ देऊन नमस्कार करा. नववधूने पाच वर्ष हळदीकुंकूच कार्यक्रम करावा.
हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते. वाण देण्याची एक पद्धत आहे. वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे म्हणजे दुसर्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शकरूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणी लागते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रातीमध्ये हळदीकुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वाण देतात. संक्रातीला वाण देणे याचे अध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देवून आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)