मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठी १८ डिसेंबरला जयपूरमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावात ३४६ खेळाडू सहभागी होणार असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. या लिलावासाठी तब्बल १००३ खेळाडूंनी अर्ज दिले होते. पण लीगमधल्या ८ टीमनी यातल्या ३४६ खेळाडूंची यादी लिलावासाठी आयपीएल कार्यकारी परिषदेला सोपावली आहे.
लिलावासाठी निवडण्यात आलेल्या ३४६ खेळाडूंपैकी ९ खेळाडूंची बेस प्राईज २ कोटी रुपये आहे. यात सॅम कुरन, ब्रॅण्डन मॅक्कलम, क्रिस वोक्स, लसीथ मलिंगा, शॉन मार्श, कोलीन इंग्राम, कोरे अंडरसन, एंजलो मॅथ्यूज आणि डी आर्सी शॉर्ट यांचा समावेश आहे.
मागच्या वर्षी जयदेव उनाडकटवर ११.५ कोटी रुपयांची बोली लागली होती. राजस्थानच्या टीमनं उनाडकटला विकत घेतलं होतं. मागच्या वर्षीच्या लिलावात उनाडकट सर्वाधिक बोली लागलेला भारतीय खेळाडू होता. पण निराशाजनक कामगिरीमुळे राजस्थाननं त्याला टीमबाहेर केलं. यावर्षी उनाडकटची बेस प्राईज १.५ कोटी एवढी आहे.
१.५ कोटीच्या यादीत जयदेव उनाडकटसोबत ९ परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये डेल स्टेन आणि मॉर्नी मॉर्कल आहेत. १ कोटी रुपयांच्या बेस प्राईजमध्ये एकूण ४ भारतीयांसोबत १९ खेळाडू समाविष्ट आहेत. युवराज सिंग, अक्सर पटेल आणि मोहम्मद शमी यांची बेस प्राईज १ कोटी रुपये आहे. २०१५ साली युवराज सिंग तब्बल १६ कोटी रुपयांना विकला गेला होता. तर २०१८ मध्ये युवराजची बेस प्राईज २ कोटी रुपये होती.
७५ लाख रुपयांच्या बेस प्राईजच्या यादीत २ भारतीयांसह १८ खेळाडू आहेत. यामध्ये ईशांत शर्माचा समावेश आहे. याशिवाय ५० लाखांच्या बेस प्राईजमध्ये ६२ खेळाडूंपैकी १८ भारतीय आणि ४४ परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या लिलावात ७ असे खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच लिलावात उतरणार आहेत आणि या खेळाडूंची बेस प्राईज ४० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ३० लाख रुपये बेस प्राईज असलेल्या ८ खेळाडूंमध्ये ५ भारतीय आणि ३ परदेशी खेळाडू आहेत. या ८ खेळाडूंचा पहिल्यांदाच लिलाव होणार आहे. २० लाख रुपयांची बेस प्राईज असलेल्या यादीत २१३ खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच लिलावात उतरतील. या २१३ खेळाडूंपैकी १९६ भारतीय आणि १७ परदेशी खेळाडू आहेत.