मुंबई : मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्स राखून दणदणीत मात केली. शतकी कॅप्टन इनिंग खेळणारा अजिंक्य रहाणे या विजयाचा शिल्पकार तर ठरलाच... पण टीम इंडियाला एक नवा मंत्र त्यानं दिला आहे.
कॅप्टन अजिंक्य रहाणेनं ऑस्ट्रेलियात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विजयी धाव घेतली आणि नवा इतिहास घडवला. कांगारूंना कांगारुंच्या देशात धूळ चारली... आठवडाभरापूर्वी पहिल्या अॅडलेड टेस्टमध्ये अवघ्या 36 रन्समध्ये टीम इंडियाचं वस्त्रहरण झालं होतं. अशा टीमचं मनोधैर्य उंचावण्याचं काम सोप्पं नव्हतं. विशेष म्हणजे विराट कोहली, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव असे टॉपचे खेळाडू नसतानाही अजिंक्यच्या टीमनं हा शानदार विजय नोंदवला.
मूळचा मुंबईकर असलेल्या कॅप्टन रहाणेनं मेलबर्नमध्ये बारावी टेस्ट सेन्चुरी झळकावली. उल्लेखनीय बाब म्हणजे रहाणेनं सेन्चुरी केल्यानंतर आतापर्यंत एकदाही भारताचा टेस्ट मॅचमध्ये पराभव झालेला नाही. कॅप्टन म्हणून अजिंक्यची ही तिसरी टेस्ट मॅच... या तिन्ही मॅचेस जिंकून त्यानं आगळी हॅटट्रिक केली आहे.
2018 नंतर बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्याची ही भारताची दुसरी वेळ आहे. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळंच अजिंक्यला मॅन ऑफ द मॅच म्हणून मुलाघ मेडल देऊन गौरवण्यात आलं.
अजिंक्यच्या कॅप्टनशीपचं आता जोरदार कौतुक होतंय. मोहम्मद सिराजला टेस्ट मॅच पदार्पणाची संधी त्यानं दिली आणि ५ विकेट्स घेऊन सिराजनं कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला.
अॅडलेड टेस्टमधील दारुण पराभवाचा वचपा टीम अजिंक्यनं मेलबर्नमध्ये काढला. आता 7 जानेवारीपासून सिडनीत पुढची मॅच होणाराय... रहाणेची टीम इंडिया अजिंक्य राहणार का, याची टेस्ट तेव्हा होणार आहे.