मुंबई : भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. खराब फॉर्ममुळे त्याला भारतीय निवड समितीने निवडीच्या कक्षेतून वगळलं होतं. या अनुभवी खेळाडूची कारकीर्द फार लवकरच संपुष्टात येणार असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र आता अजिंक्य रहाणेसाठी आणि त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये.
याचं कारण म्हणजे अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आगामी दिलीप ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणे कर्णधार म्हणून मैदानावर उतरणार आहे.
रहाणे येत्या काही दिवसांत भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. पश्चिम विभागाच्या टीममध्ये मुंबईतील नऊ खेळाडूंची निवड झाली आहे.
विभागीय निवड समितीने मुंबईचे आघाडीचे फलंदाज पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, शम्स मुलाणी आणि सुवाद पारकर यांची निवड केलीये. त्याचवेळी रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शतक झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरनेही संघात स्थान मिळवले.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील क्षेत्रीय निवड समितीने दुलीप करंडक स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय स्टार-स्टर्ड टीममध्ये श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांची निवड केली आहे आणि टीमचं नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे.
3 महिन्यानंतर रहाणे करणार कमबॅक
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर अजिंक्य रहाणे दुलीप ट्रॉफीमध्ये पहिला स्पर्धात्मक सामना खेळणार आहे. तो शेवटचा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसला होता. रहाणेला भारतीय कसोटी टीममध्ये कमबॅक करायचं असेल तर चांगला खेळ करावा लागणार आहे.