पुणे : आयपीएलमध्ये प्ले ऑफ खेळणाऱ्या चारही टीम निश्चित झाल्या आहेत. आयपीएल ग्रुप स्टेजच्या शेवटच्याच मॅचला टीम निश्चित झाल्यामुळे यंदाचं आयपीएल सर्वाधिक रोमांचक आणि चुरशीचं झालं असं म्हणावं लागेल, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि राजस्थान या टीमचा प्ले ऑफमध्ये प्रवेश झाला आहे. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं २० ओव्हरमध्ये १५३ रन केल्या होत्या. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नईला १०० रनमध्येच रोखण्याचं आव्हान पंजाबपुढे होतं. पण पंजाबला ते करता न आल्यामुळे राजस्थानची टीम प्ले ऑफला क्वालिफाय होणारी चौथी टीम ठरली आहे.
प्ले ऑफमध्ये २२ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला क्वालिफायर सामना होईल. या मॅचमध्ये हैदराबादपुढे चेन्नईचं आव्हान असणार आहे. ही मॅच जो जिंकेल त्याला फायनलचं तिकीट मिळेल. तर पराभूत झालेल्या टीमला क्वालिफायरचा दुसरा सामना खेळावा लागेल. २३ मे रोजी ईडन गार्डनवर कोलकाता आणि राजस्थानमध्ये एलिमिनेटरचा सामना होईल. हा सामना जो हरेल त्याचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल. तर दोघांपैकी जो जिंकेल तो चेन्नई-हैदराबादपैकी जी टीम हरेल त्याच्याविरुद्ध २५ मे रोजी क्वालिफायरचा दुसरा सामना खेळेल. ही मॅच जिंकलेली टीम क्वालिफायर-१ जिंकलेल्या टीमशी २७ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर फायनल खेळेल.