Arjun tendulkar : क्रिकेट यांच्यासाठी उपासना, (Sachin Tendulkar) सचिन तेंडुलकर त्यांचा देव हे समीकरण आज कोणासाठीही नवं नाही. इतक्या वर्षांपासून भारतीय क्रिकेट (Indian Cricket) जगतामध्ये नावलौकिक मिळवलेला सचिन सध्या क्रिकेटच्या मैदानात सक्रिय नाही. पण, निवृत्तीनंतरही त्याची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही. किंबहुना सचिन नही, तो अर्जुन सही असंच काही दिवसांपूर्वी अनेक क्रिकेटप्रेमी म्हणत होते. आताही म्हणतात, पण असं म्हणणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. कारण? कारण ठरतंय अर्जुनची आयपीएलमधील (Arjun Tendulkar In IPL) कामगिरी.
अर्जुन तेंडुलकरनं क्रिकेट जगतात पाऊल ठेवलं त्या क्षणापासूनच त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षांचा डोंगर क्षणोक्षणी उंचावत गेला. वडील इतके मोठे क्रिकेटपटू असल्यामुळं त्याला फार लहान वयातच या खेळाचे धडे आणि योग्य मार्गदर्शन मिळालं. अर्जुन टप्प्याटप्प्यानं पुढं आला. IPL च्या निमित्तानं त्याची मुंबई संघात (Mumbai Indians) निवड झाली. पण, सुरुवातीला त्याला संघात स्थान मिळालंच नाही. यंदाचं पर्व मात्र अर्जुनसाठी खास, कारण यंदा तो चक्क मैदानात उतरला आणि सचिनची पुढची पिढी त्याच्या डोळ्यादेखत या खेळात नव्या आव्हानांचा सामना करत होती. किंबहुना आहे.
आयपीएलमध्ये अर्जुन कोलकात्याच्या संघाविरोधात त्याचा पहिला सामना खेळला जिथं त्यानं पहिली आणि तिसरी ओव्हर टाकली. यानंतरच्या हैदराबादच्या सामन्यात त्यानं चांगली कामगिरी केली आणि 14 धावा दिल्या. पण, पंजाबविरोधातील सामन्यात मात्र त्याला विरोधी संघातील फलंदाजांनी झोडपलं. या सामन्यात त्यानं तीन ओव्हरसाठी गोलंदाजी केली खरी पण, त्यानं विरोधी संघाला 48 धावा दिल्या आणि बस्स... मग काय? याचं काही भविष्य नाही... अशा सूरात क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
जाणकार आणि क्रिकेटच्या खेळाला बऱ्याच निरीक्षणासह पाहणाऱ्या मंडळींच्या मते अर्जुनच्या गोलंदाजीला सुधारण्याची गरज आहे. असं असलं तरीही त्याच्या गोलंदाजीची Line मात्र लक्ष्यभेद करण्यासाठीच असल्याचं नाकारता येत नाही. पाकिस्तानचे माती क्रिकेटपटू रशिद लतिफ यांनी ट्विट करत अर्जुनच्या गोलंदाजीतील चार चुका अधोरेखित केल्या.
लतिफ यांच्या मते गोंलंदाजी करताना अर्जुनचा पुढचा पाय वाकतो, ज्या हातानं तो गोलंदाजी करत नाही तो अपेक्षित वेळेआधीच खाली जातो, अर्जुन त्याच्या शरीराच्या एकाच बाजूचा सर्वाधिक वापर करतो, गोलंदाजी करताना त्याच्या पायांची रचना काहीशी बिघडते. असं असलं तरीही त्याचं वय पाहता या गोष्टींमध्ये तो सुधारणा करेल अशीच त्यांची अपेक्षा.
Need to improve following steps , he is so young so he can work on it . pic.twitter.com/wsSWNACEzA
— Rashid Latif (@iRashidLatif68) April 24, 2023
इथं जाणकार आणि विश्लेषकांनी अर्जुनच्या गोलंदाजीवर बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या. त्यानं गोलंदाजीत मिळवलेल्या यशाची प्रशंसाही झाली. इतकंच काय, तर फलंदाजी करताना त्यानं लगावलेला षटकारही तुफान व्हायरल झाला. पण, मैदानात स्वत:ला सावरतानाच गडबडणारा अर्जुन पाहून क्रिकेटप्रेमींनी मात्र थेट त्यानं क्रिकेटमध्ये यायलाच नको हवं होतं अशाही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. मुळात ही बाब एक क्रिकटप्रेमी म्हणून किती योग्य याचा विचार केला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Arjun aims BIG #GTvMI #IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/cF4DZVviUm
— JioCinema (@JioCinema) April 25, 2023
कारण, कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अर्जुन मैदनात उतरताना असंख्य अपेक्षांचं ओझं त्याच्या खांद्यांवर घेऊन उतरला आहे. त्यात तो सचिनचा मुलगा म्हणून त्यानं चांगलं खेळावं, ही अपेक्षाच कितपत योग्य याचा पुन्हा विचार व्हावा. जिथं आपणच अपयश ही यशाची पहिली पायरी, किंवा अपयशानं खचू नका असं म्हणत इतरांना उपदेश करतो तिथंच आपण अर्जुनच्या बाबतीत हे विसरतोय का? हा प्रश्न स्वत:लाच विचारा. किंबहुना अर्जुनला जेव्हा सचिनचा मुलगा या चष्म्यातून पाहणं थांबवलं जाईल तेव्हाच ही परिस्थिती आणि त्याची कामगिरी आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहता येईल... नाही का?