भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे. दुखापतग्रस्त असल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल क्रिकेट अकादमीकडून (NCA) जसप्रीत बुमराहचे मेडिकल रिपोर्ट बीसीसीआय आणि अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीला सोपवण्यात आले होते. यामध्ये त्याचं रिहॅबिलिटेशन झाल्याचं सांगण्यात आलं होत. पण वैद्यकीय पथक तो चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळू शकेल की नाही याबाबत खात्रीशीर नव्हते. यानंतर हा निर्णय अजित आगरकरकडे सोपवण्यात आला. त्याने बुमराहच्या बाबतीत ही जोखीम घेण्यास नकार दिला. निवड समितीने 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी बुमराहच्या जागी हर्षितला संधी दिली आहे. तसंच यशस्वीच्या जागी वरुण चक्रवर्तीला संघात स्थान दिलं आहे.
2022 मध्ये पाठीच्या खालच्या भागावर शस्त्रक्रिया झालेल्या बुमराहला सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना आणखी एक ताणतणावामुळे दुखापत झाली. पहिल्या डावात 10 ओव्हर्स टाकल्यानंतर त्याने माघार घेतली होती. त्याला एक महिना पूर्ण विश्रांती देण्यात आली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराह उपलब्ध नव्हता.
"बुमराहला पाच आठवड्यांसाठी विश्रांती घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्याचे एनसीएमध्ये स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर रजनीकांत आणि फिजिओ थुलसी यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन झाले," असं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं.
अधिकाऱ्याने बुमराहचे स्कॅन रिपोर्ट ठीक आहेत, मात्र एनसीएचे प्रमुख नितीन पटेल यांनी अंतिम निर्णय अजित आगरकरवर सोपवला होता. बुमराहची सामन्यात खेळताना चाचणी न झाल्याने त्यांनी आगरकरला निर्णय घेण्यास सांगितलं अशी माहिती त्याने दिली आहे.
एनसीए प्रमुख नितीन पटेल यांनी पाठवलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, त्याचे पुनर्वसन आणि स्कॅन अहवाल पूर्णपणे ठीक असल्याचं दिसून आलं असले तरी, स्पर्धा सुरू होईपर्यंत तो तंदुरुस्त होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे निवडकर्त्यांनी कोणताही धोका पत्करला नाही.
"नितीन यांनी चेंडू अजित आगरकर (मुख्य निवडकर्ता ) यांच्या कोर्टात ढकलला. त्यामुळे अनफिट खेळाडूला संघात स्थान देण्याचा धोका कोणीही पत्करू इच्छित नाही. जर वैद्यकीय पथकाने पूर्णपणे हिरवा कंदील दाखवला नाही, तर निवड समिती तो धोका कसा घेऊ शकते," असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
अहमदाबादमध्ये निवड समितीचे अध्यक्ष आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात झालेल्या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहला घ्यायचं की अनुभव नसलेल्या राणाला घ्यायचे यावर चर्चा झाली.
"धोका खूप जास्त आहे आणि बुमराह एखाद्या सामन्यात अपयशी ठरला असता तर ते पूर्णपणे लाजिरवाणे ठरले असते. नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखालील एनसीएने 2022 मध्ये एकदा टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसाठी बुमराहला पाठवलं होतं तेव्हा आपले हात पोळून घेतले होते. तेव्हा तो एक वर्षासाठी बाहेर पडला होता. ती चेतन शर्माची समिती होती आणि म्हणून आगरकरला ही जोखमी घ्यायची नव्हती," असं त्याने म्हटलं.