हिंदी चित्रपसृष्टीत दर दिवशी हजारो तरुण, तरुणी आपलं नशीब आजमावण्यासाठी येत असतात. यामध्ये फक्त मुंबई किंवा देशातील नव्हे तर परदेशातील तरुण, तरुणीही असतात. एखाद्या दिवशी आपलंही नशीब चमकेल आणि मोठे स्टार होऊ अशी आशा उराशी बाळगून रोज त्यांचा संघर्ष सुरु असतो. यासाठी निर्माते, दिग्दर्शकांच्या ऑफिसच्या पायऱ्या झिजवल्या जातात. यातील काहींनी अपेक्षित यश मिळतं, तर काहीजण मात्र छोट्या, मोठ्या भूमिकांपुरते मर्यादित राहतात. अशाच प्रकारे इराणची एक मॉडेल भारतात आली होती. तिने जाहिराती, चित्रपट, रिअॅलिटी शोमध्ये काम केलं. पण अखेर तिने अभिनय सोडून दिला. तिने एका भारतीय उद्योगपतीशी लग्नही केलं, पण घरगुती हिंसाचारामुळे घटस्फोसाठी अर्ज केला.
या अभिनेत्रीने शाहरुख खान, सैफ अली खान, शाहिद कपूर, करिना कपूर अशा मोठ्या अभिनेत्यांसह काम केलं. ती बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकही होती. या अभिनेत्रीचं नाव मंदना करिमी आहे.
मंदना करिमीचा जन्म इराणमधील तेहरान येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला. तिच्या पालकांचे वंशज उपखंडात असल्याने ती अनेकदा भारताबद्दलच्या तिच्या प्रेमाबद्दल बोलत असे. तिने एअरहोस्टेस म्हणून काम करायला सुरुवात केली होती. पण नंतर तिने नोकरी सोडली. त्यानंतर तिने मॉडेलिंग आणि अभिनयात हात आजमावला. ती भारतात मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्टसाठी आली होती.
बिग बॉस सीझन 9 मधून तिला लोकप्रियता मिळाली. त्या सीझनमध्ये ती दुसरी उपविजेती ठरली. यानंतर 2022 मध्ये तिने 'लॉक अप'मध्येही भाग घेतला जिथे तिने तिच्या आयुष्याबद्दल काही खुलासे केले ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.
यानंतर ती रॉय, भाग जॉनी, मै और चार्ल्स अशा चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसली होती. तसंच क्या कूल है हम, थार या चित्रपटांमध्येही काम केलं.
'लॉक अप' हा रिअॅलिटी शो त्याच्या ट्विस्टसाठी ओळखला जात होता. 'जजमेंट डे' वर एका एपिसोडमध्ये तिने एक गुपित उघड केले ज्याने तिचे आयुष्य बदलून टाकले. आपल्या खासगी आयुष्यातील एक गुपित उघड करताना तिने कसं एका प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शकाने आश्वासने दिली आणि ती पाळली नाहीत याबद्दल सांगितलं. यावेळी तिने दिग्दर्शकाचं नाव जाहीर करण्यास नकार दिला.
ती म्हणाली की, "आम्ही गर्भधारणेची योजना आखली होती. पण जेव्हा ती झाली तेव्हा तो पूर्णपणे मागे हटला. त्याने माझ्यासाठी खूप काही उद्ध्वस्त केलं". घटस्फोटादरम्यान तिने आपण एका प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शकासोबत गुप्त संबंधात आहोत ज्याने इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव केलं असून, अनेक लोक त्याला आदर्श मानत होते असा खुलासा केला. तो महिलांच्या हक्कांच्या महत्त्वाबद्दल देखील बोलत असतो. पण गरोदरपणाबद्दल त्याला माहिती मिळाल्यानंतर, तो घाबरला आणि मग एकत्रितपणे ती संपवण्याचं ठरवलं असं तिने सांगितलं.
मंदना करिमीने लगेचच इंडस्ट्री सोडली. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, "अभिनय एक असं काम होतं ज्यावर मी कधीच प्रेम केलं नाही, तसंच या इंडस्ट्रीवरही. मी तिथे जो वेळ घालवला त्याबद्दल आनंदी आहे. पण मी त्यासाठी भुकेली किंवा वेडी होते असं नाही".
तिला शिक्षण पूर्ण करता न आल्याबद्दल पश्चात्ताप होत होता. तिने इंटीरियर डिझायनिंगचा कोर्स केला. आज ती इंटीरियर डिझाइनर आहे.