ऋषभ पंतचा जीव वाचवणाराच आज देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

Sad News About Man Who Saved Rishabh Pant: पंतचा उत्तरखंडमध्ये भीषण अपघात झाला होता. त्यामधून त्याला वाचवणाऱ्यांमध्ये या तरुणाचा समावेश होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 12, 2025, 03:01 PM IST
ऋषभ पंतचा जीव वाचवणाराच आज देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीचा मृत्यू, नेमकं घडलं काय? title=
पंतचा जीव त्यानेच वाचवलेला

Sad News About Man Who Saved Rishabh Pant: दोन वर्षांपूर्वी उत्तरखंड येथे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामधून पंतचा जीव वाचवणारा तरुण स्वत:च्या आयुष्याला कंटाळून मृत्यूच्या दाढेत पोहोचला आहे. प्रेमभंग झाल्याने या तरुणाने आपल्या प्रेयसीबरोबर विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचारानंतर प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्या प्रेयकरावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

नेमकं घडलं काय?

हा सारा प्रकार उत्तर प्रदेशमधील मुज्जफरानगर येथील पुरकाजी पोलीस स्थानकाच्या परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बुच्चा गावात झाला आहे. येथील 25 वर्षीय रजत कुमार आणि 21 वर्षीय मनु कश्यप या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र हे दोघे वेगवेगळ्या समाजातील असल्याने त्यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता. या दोघांचा विरोध जुगारुन त्यांच्या घरच्यांनी त्यांची लग्न ठरवली. त्यामुळे दोघांनी तीन दिवसांपूर्वी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. या मध्ये प्रेयसीचा मृत्यू झाला असून रजतवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

आईचे गंभीर आरोप

समोर आलेल्या माहितीनुसार, रजत आणि त्याच्या प्रेयसीने 9 फेब्रुवारीच्या रात्री विष प्राशन केलं. आपल्याला कोणीही समजून घेणारं नसल्याने आपल्याकडे आत्महत्येशिवाय इतर पर्याय नसल्याचं या दोघांनी ठरवलं आणि विष प्राशन केलं. मात्र हे दोघे बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान प्रेयसीचा मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने रजतवर गंभीर आरोप केले आहेत. रजतने माझ्या मुलीला घरातून पळवून नेलं आणि तिला विष पाजल्याचं मृत तरुणीच्या आईने म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून प्रियकरावरील उपचार झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

पंतचे प्राण वाचवलेले

ऋषभ पंत दोन वर्षांपूर्वी नाताळाच्या कालावधीमध्ये दिल्लीवरुन उत्तराखंडला जात असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला होता. गुरुकुल नारसन हायवेवर झालेल्या या अफघातानंतर दोन तरुणांनी पंतला गाडीचा स्फोट होण्याआधी बाहेर खेचून काढलं होतं. या दोघांनीच पंतच्या अपघाताची पोलिसांना माहिती दिली होती. या दोघांपैकी एकजण रजतच होता. 

पंतने भेट दिलेली स्कुटी

ऋषभ पंतने रजतला स्कुटी भेट दिली होती. मात्र आता तो रुग्णालयामध्ये स्वत:च्या आयुष्याची लढाई लढत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.