Raj Thackeray MNS On Sharad Pawar Praising Eknath Shinde: नवी दिल्लीमधील 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार सोहळ्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्यानंतर यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप नोंदवला आहे. ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांवर यावरुन निशाणा साधला आहे. पवारांनी या कार्यक्रमाला नव्हतं जायचा पाहिजे. त्यांच्या हस्ते आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू म्हणातो अशांचा सत्कार होणं दुर्देवी असल्याची टीका राऊतांनी केली. एकनाथ शिंदेंची शिवसेनेबरोबरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावरुन राऊतांवर निशाणा साधल्याचं दिसत आहे. असं असतानाच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या वादात उडी घेत उद्धव ठाकरेंच्या सेनेला लक्ष्य केलं आहे.
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याचा संदर्भ देत मनसेचे नेते संदीप देशपांडेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, "शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही शिंदेंच्या सगळ्याच आमदारांचा सत्कार करायला हवा होता कारण या शिंदेंनी महाराष्ट्राची निष्क्रीय मुख्यमंत्र्यांपासून सुटका केली. शरद पवारांनाही ठाकरेंपासून आणि संजय राऊतांपासून सुटका हवी होती. मनात आणलं असतं तर शरद पवारांनी सत्ता वाचवली असती पण त्यांनी ते केलं नाही," असं विधान केलं.
पुढे बोलताना, "शरद पवार कधी स्वत:चं सोडून दुस-याचं नेतृत्व मान्य करणार नाहीत. ठाकरेंपासून सुटकेचे मार्ग पवार शोधत आहेत. ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद बदललं नसतं तर महाराष्ट्र लॉकडाऊन लॉकडाऊन खेळत बसला असता. आपण महाराष्ट्रात एका निष्क्रीय मुख्यमंत्र्याला बसवलं ही चूक झाली हे आता पवारांना कळलं असावं," असं म्हणत देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
नक्की वाचा >> 'पवारांकडून शिंदेंचा सत्कार दुर्देवी, ज्यांनी महाराष्ट्राची..', राऊतांचा हल्लाबोल! संतापून म्हणाले, 'अजित पवारांनी तुमचा..'
"युती आणि आघाड्यांमध्ये कुरबुरी होतच असतात. तसंच सध्या भाजप-शिंदेंमध्ये होत असावं. 'हम करे तो रासलीला दुसरा करे तो कॅरेक्टर ढीला' हा राऊतांचा खाक्या. एकतर तू राहशील नाहीतर मी असं म्हणणारे उद्धव टाकरे फडणवीसांना जाऊन भेटलेच ना?" असा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे संजय राऊतांना सल्ला देताना, "संजय राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. राऊतांनी सकाळी 9 वाजता बसून आत्मचिंतन करण्याची गरज आहे," असंही देशपांडे म्हणाले.
नक्की वाचा >> 'भाजपा व राज ठाकरेंच्या ‘मनसे’ची ‘तन-मन-धना’ची..'; ठाकरेंच्या सेनेचे फटकारे! म्हणाले, 'मित्रपक्षाला..'
"इव्हीएमबाबत संजय राऊत आणि आमची मतं समान नाहीत. राज ठाकरेंनी केवळ अजित पवारांच्या पक्षाला मिळालेल्या मतांविषयी शंका व्यक्त केली. ही शंका भाजपविषयी नव्हती," असंही देशपांडेंनी स्पष्ट केलं आहे.