MNS On Uddhav Thackeray Shivsena Comment: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील दादरमधील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' येथे जाऊन त्यांची भेट घेतली. यावरुनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज ठाकरेंच्या घराचा 'कॅफे' असा उल्लेख करत खोचक पद्धतीने निशाणा साधला आहे. या टीकेला आता मनसेनंही आपल्या स्टाइलमध्ये उत्तर दिलं आहे.
"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते सुभाष देसाई, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर असे एक शिष्टमंडळ सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. या भेटीवर पत्रकारांनी पतंग उडवले, पण ते पतंग काही फार वर गेले नाहीत. शिवतीर्थावरील स्मारकाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. हे स्मारक सरकार बनवत असल्याने सरकारी भेटीगाठी होणारच," असं 'सामना'मधील अग्रलेखात म्हटलं आहे. पुढे बोलताना, "विरोधी पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यावर बंधने आलेली नाहीत. त्याच दिवशी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस शिवाजी पार्कात छुपा मित्रपक्ष असलेल्या राज ठाकरेंच्या भेटीस गेले. त्या भेटीबद्दलही तर्क-वितर्क आणि कुतर्क लढवून बातम्यांचे फुगे हवेत सोडले गेले. फडणवीस-राज’ यांची काय ही पहिलीच भेट नव्हती. भाजपचे इतरही नेते राज यांच्या घरी नियमित चहापानासाठी जात-येत असतात," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं.
एवढ्यावरच न थांबता राज ठाकरेंचं घराला कॅफे अशी उपमाही ठाकरेंच्या सेनेनं दिली आहे. "मनसेप्रमुखांचे निवासस्थान हे सध्या राजकीय ‘कॅफे’ बनले आहे व भाजपच्या शेलार, लाड वगैरे अतिज्येष्ठ नेत्यांना त्या कॅफेत राखीव जागा आहेत, पण मुख्यमंत्री जातात व ‘न्याहरी’साठी गेल्याचे सांगतात तेव्हा त्या कॅफेचे महत्त्व वाढते. खरं म्हणजे मुख्यमंत्री गेले यात नवल ते काय? भाजप व राज यांच्या ‘मनसे’ पक्षाची ‘तन-मन-धना’ची युतीच आहे. त्यामुळे युतीतील पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी मुख्यमंत्री तेथे गेले असतील," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.
नक्की वाचा >> 'पवारांकडून शिंदेंचा सत्कार दुर्देवी, ज्यांनी महाराष्ट्राची..', राऊतांचा हल्लाबोल! संतापून म्हणाले, 'अजित पवारांनी तुमचा..'
ठाकरेंच्या सेनेनं केलेल्या या टीकेवर मनसेचे नेते संदीप देशपांडेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावरुन त्यांनी थेट 'मातोश्री'चा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेला प्रश्न विचारला आहे. "ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. काही जण भावाला नातू झाला तर भेट घेतात. फडणवीस हे संस्कृती पाळतात. काही जण भावाला भेटत नाहीत. याचं उत्तर राऊत यांनी द्यावं," असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी लगावला आहे. "ज्या वेळी अडवाणी, राजनाथ सिंग, शरद पवार, मिलिंद देवरा 'मातोश्री'वर जाऊन भेट घेत होते, जेवत होते त्यावेळी काय 'मातोश्री'वर खानावळ उघडली आहे असं म्हणावं काय?" असा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला आहे.