'लालबागच्या राजाची परंपरा तुम्ही खंडित केलीत, तुमचा काय..'; BJP चा ठाकरेंवर हल्लाबोल! POP मूर्ती वाद तापला

Ganpati Idol POP Statue Issue: माघी गणपती उत्सवादरम्यान पीओपी गणेश मूर्तींच्या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलेले असतानाच ठाकरेंचा पक्ष आणि भाजपा आमने-सामने आला आलेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 12, 2025, 12:14 PM IST
'लालबागच्या राजाची परंपरा तुम्ही खंडित केलीत, तुमचा काय..'; BJP चा ठाकरेंवर हल्लाबोल! POP मूर्ती वाद तापला title=
भाजपाची कठोर शब्दांमध्ये टीका (प्रातिनिधिक फोटो)

Ganpati Idol POP Statue Issue: मुंबईमधील माघी गणेश उत्सवादरम्यान पीओपीच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनावरुन वाद निर्माण झालेला असतानाच आता या वादाला राजकीय रंग मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधल्यानंतर भारतीय जनता पार्टीने ठाकरेंच्या कार्यकाळातील अनेक घटनांचा संदर्भ देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

पिताश्रींनी मुख्यमंत्री असताना...

"श्रीमान आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी आहात," असं आशिष शेलार यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे. "आज माघी गणेशोत्सवातील पिओपीच्या गणेश मूर्ती अडचणीत आलायत, त्यावर खूश होऊन तर आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही बोलत नाही ना?" असा सवाल शेलार यांनी केला आहे. पुढे बोलताना, "कारण यांच्या पिताश्रींनी मुख्यमंत्री असताना शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बंद कसा पडेल याचेच प्रयत्न केले. लालबागच्या राजाची परंपरा तुम्ही खंडित केलीत," असा घणाघात शेलार यांनी केला आहे. "गणेशोत्सव असो वा दहिहंडी उत्सव ज्या ज्या वेळी अडचणीत सापडला तेव्हा हे कधीच त्याची बाजू मांडायला न्यायालयात गेले नाहीत. आजही जाणार असे सांगत नाहीत. हिंदू देव देवता, मंदिर आणि उत्सव, विशेषतः अयोध्येतील राम मंदिर या सगळ्याचे हे विरोधक आहेत. टीकाकार आहेत," अशी टीका शेलार यांनी केली आहे.

तुमचा काय अधिकार आहे?

एवढ्यावरच न थांबता, "हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा यांना त्रास होतो. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायाला ज्यांनी हात लावला नाही. जे अजान स्पर्धा भरवतात आणि ज्यांना "भोंग्यांचा आवाज" हल्ली सुमधुर वाटतो आणि गणपतीची आरती हातात घेणे जे टाळतात. ते आता माघी गणेशोत्सवावर बोलतात? तुमचा काय अधिकार आहे?" असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. पोस्टमध्ये पुढे, "हे सुखकर्ता.. दुखहर्त्या... तुझे हे ढोंगी, स्वार्थी भक्त आज जी तुझी "आरती" करीत आहेत ते म्हणजे निव्वळ ढोंग.. ढोंग आणि ढोंग!" असंही शेलार म्हणालेत. "महाराष्ट्रातील गणेशभक्त यांच्यापासून सावध झालाच आहे, आता गणपती बाप्पा तूही यांचे हे ढोंगी रुप पाहून घे रे महाराजा!" असं पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. 

कोर्टात मांडणार बाजू

दरम्यान, महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनावरील बंदीविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरकार न्यायालयासमोर आपली बाजू मांडणार असून पीओपी विसर्जनावर असलेली बंदी उठवण्याची मागणी केली जाणार असल्याचे समजते.