Delhi Metro Viral Video: सर्वसामान्यांना नेहमीच्या प्रवासासाठी मेट्रोचा प्रवास सोयीस्कर वाटतो. रोज असंख्य लोक मेट्रोतून प्रवास करत असतात आणि अशावेळी घडत असलेल्या काही मजेशीर तसेच भयानक घटना अनेकांनी पाहिल्या असतील किंवा ऐकल्या तरी असतील. विशेषत: दिल्ली मेट्रोतील प्रवासादरम्यान घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत तर बऱ्याचजणांना माहित असेल. दिल्ली मेट्रोच्या प्रवासासंबंधित अनेक विचित्र घटना पाहायला मिळतात. कधी लोक मेट्रोमध्ये नाचताना, गाताना दिसतात तर कधी मोठे वादही होत असल्याच्या बातम्या समोर येतात. नुकताच, सोशल मिडीयावर दिल्ली मेट्रोत चोरी करणाऱ्या महिलेचा आश्चर्यचकित करणारा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला लोकांची नजर चुकवून चोरीचा प्रयत्न करताना दिसत आहे. मेट्रोचा दरवाजा उघडताच लोक आत चढत असताना एक महिला ही मागच्या बाजूला बॅग ठेवून चढताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिच्या मागे उभी असलेली एक महिला अगदी हुशारीने बॅगेची चेन खोलण्याचा प्रयत्न करतेय. तसेच हे करताना तिने आपल्या स्कार्फचा वापरही केला.
खरंतर हा सगळा प्रकार एक व्यक्ती पाहत होती आणि आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होती. महिलेने बॅगेची चेन उघडताच ती व्यक्तीने चोरी करणाऱ्या त्या महिलेला अडवलं आणि नंतर सगळ्या प्रवासींचे लक्ष वेधून घेतले. यानंतर चोरी करणारी महिला मेट्रोमध्ये चढण्याऐवजी घाबरुन तिथून पळण्याचा प्रयत्न करत होती.
हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आणि "दिल्ली मेट्रोमध्ये तुमचे स्वागत आहे." असे व्हिडीओसोबत लिहिले होते. यावर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. कमेंटमध्ये एकाने मेट्रोमध्ये होत असलेली चोरी वेळीच पकडलेल्या व्यक्तीला शाबासकी दिली, तर दुसऱ्याने मेट्रोमध्ये सावध राहण्याचा सल्ला दिला. एका नेटकऱ्याने लिहिले की, "मेट्रो अशा चोरांनी भरलेली आहे, जे इतके तरबेज आहेत की त्यांना कोणी पकडू शकत नाही." दुसऱ्या यूजरने लिहिले की, "दिल्ली मेट्रोमध्ये हे सर्व सामान्य आहे". तसेच "आपल्या पाठीवर बॅग घेऊन जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, ते सर्वात मोठे लक्ष्य आहेत." असे देखील एका नेटकऱ्याने लिहिले आहे.