संभाजीनगरात महिना 13 हजार कमवणाऱ्याकडे 16 लाखांचा गॉगल; पोलीस हादरले! हा तरुण आहे तरी कोण?

Chhatrapati Sambhaji Nagar: जप्त केलेला हा गॉगल पाहिल्यानंतर छत्रपती संभाजी नगरमधील पोलीस खात्यातील अधिकारीही थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 12, 2025, 10:05 AM IST
संभाजीनगरात महिना 13 हजार कमवणाऱ्याकडे 16 लाखांचा गॉगल; पोलीस हादरले! हा तरुण आहे तरी कोण? title=
पोलिसांनी हा गॉगल केला जप्त

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलामधील घोटाळा प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घोटाळा प्रकरणातील आरोपीकडे जगातील सर्वात महागड्या गॉगलपैकी एक असल्याची माहिती समोर आली आहे. हा गॉगल सध्या चर्चेचा विषय ठरत असून गॉगलसंदर्भातील थक्क करणारी माहिती पुढे येत आहे. हा गॉगल खास जर्मनीवरुन मागवण्यात आल्याचं समजतं.

सर्वात महागड्या गॉगलपैकी एक

जगातील सर्वात महागड्या गॉगलपैकी एक भारतात असून त्याचा मालक छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलातील 21 कोटींचा घोटाळा करणारा आरोपी हर्ष क्षीरसागर आहे. त्याने हा गॉगल जर्मनीहून 16 लाखांत मागवला होता. आता या गॉगलची किंमत 16 लाख रुपये इतकी का आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागेही विशेष कारणं आहे.

गॉगल एवढा महाग का?

हर्ष क्षीरसागरने जर्मनीवरुन मागवलेल्या या गॉगलची फ्रेम ही साधीसुधी नसून ती प्लॅटिनमची आहे. प्लॅटिनम हा महागड्या धातूंपैकी एक आहे. याशिवाय या विशेष गॉगलला 180  हिरे लावलेले आहेत. पोलिसांनी हा गॉगल जप्त केला आहे. सध्या हा गॉगल पोलिसांच्या ताब्यात आहे. हर्ष क्षीरसागर न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

खास तयार करुन घेतलेला गॉगल

खरं तर या गॉगलची मूळ किंमत साडेतीन लाख रुपयांपर्यत आहे. मात्र त्यामध्ये पर्सनलायझेशन केल्यास अधिक किंमत मोजावी लागते. हर्ष क्षीरसागरने तर या गॉगलच्या दांड्यांना हिरे लावून घेतल्याचं उघड झालं आहे. हर्ष क्षीरसागरने आपल्या या लाखो रुपयांच्या गॉगलच्या दांड्यांना 'व्हीव्हीएस 1' दर्जाचे हिरे बसवले आहेत. गॉगलच्या दोन्ही दांड्यांना 'पियानो वूड'चं वर्क करण्यात आलं आहे. विशेष ऑर्डर करुन तायर करण्यात येणार हे कस्टमाइज गॉगल फार महाग असतात. हर्ष क्षीरसागर हैस म्हणून मागवलेला हा गॉगल कंपनीच्या सिग्नेचर पीसपैकी एक आहे.

13 हजार पगार अन् कमाई 21 कोटी

हर्ष क्षीरसागर संभाजी नगरच्या विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी लिपिक पदावर कार्यरत होता. त्याचा पगार फक्त 13 हजार इतका असताना त्यानं  तब्बल 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपये कमावले.  हर्ष क्षीरसागर  वर्षभरातच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून कोट्यावधी रुपये आपल्या 2 बँक खात्यांवर वळते केले. नंतर ते  तब्बल 15 पेक्षा जास्त खात्यावर वळवून खर्च केले. हा सगळा आर्थिक घोटाळा करण्यासाठी हर्षने यशोदा शेट्टी या कर्मचाऱ्याचीही मदत घेतली. 
आई-वडिलांबरोबरच त्या मैत्रिणीलाही अटक

त्याच्याबरोबरच त्याचे आई-वडील आणि मैत्रिणीलाही अटक

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीमधून अटक करण्यात आलेला हर्ष क्षीरसागरने केलेला 21 कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर तो 11 दिवस फरार होता.  निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथून  पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हर्षकुमार क्षीरसागर याच्या आई-वडीलांना कर्नाटकच्या मुरुडेश्वर मधून ताब्यात घेण्यात आले आहे.  हर्षकुमारची मैत्रिण अर्पिता वाडकरला पोलिसांनी अटक केली आहे.

हर्ष क्षीरसागरकडे सापडलेली संपत्ती

- 1.35 कोटींची बीएमडब्ल्यू कार
-1.20 कोटी रुपयांचे वडिलांचे 4 फ्लॅट
-1 कोटी खर्च करून घरात इंटिरियरचं काम
-बँक खात्यात 3 कोटींची रक्कम
-चीनमधून 50 लाखांची खरेदी
-40 लाखांच्या 2 स्कोडा कार
-32 लाखांची बीएमडब्ल्यू बाईक

हर्षची मैत्रीण अर्पिता वाडकरकडे सापडलेली संपत्ती

- छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाण्यात 1.35 कोटींचा फ्लॅट
- मुंबईत 1.05 कोटींचा फ्लॅट
- 1.44 लाखांचा आयफोन
-15 लाखांची स्कोडा गाडी
- 1.09 लाखांचा स्मार्टफोन
- 3 बँका खात्यात 1 कोटी 1 लाख रुपये