Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! मोठ्या खेळाडूला वगळल्याने वाढलं टेन्शन

ICC Champions Trophy 2025 Team India Squad: मंगळवारी रात्री उशीरा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघात दोन महत्त्वाचे बदल आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 12, 2025, 06:58 AM IST
Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! मोठ्या खेळाडूला वगळल्याने वाढलं टेन्शन title=
भारतीय संघाची घोषणा

ICC Champions Trophy 2025 Team India Squad: चॅम्पियन्स ट्रॉफी मालिकेसाठी मंगळवारी रात्री उशीरा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मानद सचिव देवजित साकीया यांनी जारी केलेल्या भारतीय संघाच्या यादीमधून एक महत्त्वाचं नाव वगळण्यात आलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) नाव वगळण्यात आलं असून स्पर्धेपूर्वीच ही भारताला थोडी चिंतेत टाकणारी बाब आहे. विशेष म्हणजे अनेक मालिकांमध्ये भारताला केवळ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकून देणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या जागी नवख्या खेळाडूला प्राधान्य देण्यात आलं आहे. 

...म्हणून बुमराहला वगळलं

"वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे. त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने त्याला वगळण्यात आलं आहे. निवड समितीने हर्षित राणाला बुमराहच्या जागी संघात स्थान दिलं आहे," असं बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. खास बाब म्हणजे भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. यापूर्वी बीसीसीआयने जारी केलेल्या तात्पुरत्या स्वरुपातील यादीमधील यशस्वी जयसवालऐवजी आता वरुण चक्रवर्तीला संघात स्थान दिलं आहे, असं पत्रात म्हटलं आहे. 

कोणावर कोणती जबाबदारी?

रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार असून उपकर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. मधल्या फळीमध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यरसारखे दमदार फलंदाज असून संघामध्ये दोन यष्टीरक्षकांना स्थान देण्यात आलं आहे. के. एल. राहुल आणि ऋषभ पंत हे दोन यष्टीरक्षक संघात आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आलं आहे.  फिरकी गोलंदाज म्हणून वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव या दोघांना संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे असेल

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ खालीलप्रमाणे :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

संघासोबत प्रवास न करणारे मात्र राखीव खेळाडू:

यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे हे तिन्ही खेळाडू आवश्यकतेनुसार दुबईला जातील, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.