Fact Check Report : भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हे दोघे दोन वर्षांपूर्वी 23 जानेवारी 2023 रोजी लग्न बंधनात अडकले. यापूर्वी काही वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते. अभिनेत्री अथिया ही प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. अथिया आणि केएल राहुल या दोघांनी नोव्हेंबर महिन्यात दोघांच्या आयुष्यात लवकरच नवा पाहुणा येणार असल्याचं जाहीर केलं होतं. 2025 मध्ये अथिया आणि राहुलचं बाळ जन्माला येणार आहे. मात्र काही दिवसांपासून अथिया शेट्टी हिने दोन गोंडस बाळांना जन्म दिला असल्याच्या बातम्या आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र यामागचं नेमकं सत्य काय? खरंच अथिया आणि राहुलला जुळी मुलं झाली आहेत का? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर मागील 5 ते 10 दिवसांपासून अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी दोन गोंडस मुलांना जन्म दिलाय अशा आशयाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले जात आहेत. फेसबुकवरील स्टार फ्लॅश या पेजवरून काही फोटो पोस्ट करण्यात आले. यात अथिया गरोदर असल्याचे दिसते. तर दुसऱ्या फोटोत सुनील शेट्टी आणि केएल राहुल या दोघांनी बाळाला हातात घेतले आहे असे दाखवण्यात आले. तर बॉलिवूड एच टीव्ही या युट्यूब चॅनलवर देखील एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात देखील अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला असल्याचे सांगण्यात आले आहे.
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या फोटोंच्या सत्यतेबाबत झी 24 तासने तपासणी केली असता हे सर्व फोटो एडिटेड आणि बनावट असल्याचे समोर आले आहे. एका महिलेच्या फोटोवर अथियाचा चेहरा लावण्यात आलेला आहे असं स्पष्ट कळून येतंय. सर्च इंजिनवर पाहिल्यास अशा प्रकारचे काही बनावट फोटो हे कॉमेडियन भारती सिंह, ईशा अंबानी आणि इतर अभिनेत्रींचे बनवले असल्याचे समोर आले. तसेच या संदर्भातील किवर्ड शोधल्यावर अथिया आणि केएल राहुल यांना जुळी मुलं झाली आहेत अशी या बातमीची पुष्टी करणारी कोणतीही विश्वसनीय बातमी आम्हाला आढळून आलेली नाही.
क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी या दोघांनी 8 नोव्हेंबर रोजी शेअर केल्या एका पोस्टमध्ये दोघे लवकरच आई बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावर अनेक सेलिब्रिटींच्या कमेंट्स सुद्धा आल्या होत्या. त्यानंतर अथियाने 29 जानेवारी रोजी तिचं बेबी बम दिसत असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. कोणत्याही अफवा उडू नयेत म्हणून सेलिब्रिटी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भातील अधिकृत माहिती शेअर करत असतात. मात्र केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी त्यांना बाळ झालं असल्याची अधिकृत घोषणा कोणत्याही माध्यमावरून अद्याप केलेली नाही. त्यामुळे केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांना जुळी मुलं झाली असल्याची बातमी खोटी असून यासंबंधित शेअर केले जाणारे फोटो देखील एडिटेड असल्याचे झी 24 तासच्या फॅक्ट चेक रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.