Exclusive:महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शहाजीराजेंचा विसर? समाधीवर साधं छप्परही नाही!

Shahaji Raje: होजिगिरी गावाजवळच्या माळरानावर 20 गुंठे जागेवर शहाजी महाराजांची समाधी आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 11, 2025, 07:25 PM IST
Exclusive:महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शहाजीराजेंचा विसर? समाधीवर साधं छप्परही नाही! title=
शहाजी राजे समाधी

Shahaji Raje: स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांची समाधी दुर्लक्षीत असल्याचा आरोप होऊ लागलाय. शहाजी महाराजांच्या समाधीबाबत पानिपतकार विश्वास पाटील यांनी ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. शहाजी महाराजांच्या समाधीवर गंजलेल्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही असं ट्विट त्यांनी केलंय.  कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातल्या होजिगिरी गावात शहाजीराजेंची समाधी असून, ती दुर्लक्षित असल्याचं विश्वास पाटील यांनी म्हंटलंय. 

होजिगिरी गावाजवळच्या माळरानावर 20 गुंठे जागेवर शहाजी महाराजांची समाधी आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेवून राज्यकारभार करणा-याना याचा विसर का पडला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. लंडनला वाघनखं आणण्यासाठी जाणा-यांना स्फूर्तीचा हा झरा अडगळीत पडल्याचं दिसत नाही का असा सवालही त्यांनी केलाय. 

सर्व महापुरुषांबद्दल सरकारला आदर आहे. तुम्ही ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या समाधीस्थळाबद्दल आपण तरतूद करतो. अशा ठिकाणांबद्दल माहिती घेतली जाईल, पाठपुरावा केला जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यात होजिगिरी या खेड्यात शहाजीराजांची समाधी आहे. अवघ्या 20 गुंठे जमिनीवरच्या उघड्या माळरानावर शहाजीराजेंची समाधी आहे.समाधीवर साधं पत्र्याचं छप्परही नाही. 23 जानेवारी 1664 रोजी याच परिसरात घोड्यावरुन पडून शहाजीराजांना अपघात झाला. इथेच शहाजीराजांचं महानिर्वाण झालं.

काय आहे विश्वास पाटलांची फेसबुक पोस्ट?

शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि "#महाराष्ट्र "या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकाच्या मातीत ( कशाबशा 20 गुंठे जमिनीवरच्या  उघड्या माळरानावर ) एकाकी स्थितीत  चिरनिद्रा  घेत आहेत.त्या वीर पित्याच्या समाधीवर साधे गंजक्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही. ती दुरवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणि पोटात गोळा  उठेल   गनिमी काव्याच्या युद्धतंत्राची  दीक्षा #महागुरु शहाजी महाराजांनीच आपले पुत्र शिवरायांना दिली होती. एवढेच नाही तर शिवरायांची प्रसिद्ध  राजमुद्राही  संस्कृत भाषेचे  प्रकांड पंडित असलेल्या शहाजीराजांनी स्वतः  लिहिली होती.जेव्हा 1624 साली दिल्लीचा बादशहा औरंगजेबाचा आजा जहांगीर आणि विजापूरचा #इब्राहिम_आदिलशहा यांची फौज इथे चालून आली होती. तेव्हा भातवडीच्या लढाईत शहाजीराजे आणि मलिक अंबर या दोघांनीच  "गनिमी कावा" नावाच्या   युद्धमंत्राला पहिल्यांदा जन्म दिला होता.  त्याच्या जोरावर तेव्हा  केवळ चाळीस हजारांच्या  फौजेनिशी या दोघांनी  विजापूरकर आणि दिल्लीकरांच्या एक लाखांच्या  फौजेचा धुव्वा उडवला होता. 

नुकताच मी कर्नाटकात जाऊन आलो. शिमोगा या शहरापासून  एक तासाच्या अंतरावर असणाऱ्या होजिगिरी नावाच्या खेड्यात( जिल्हा दावणगिरी )शहाजी राजांच्या समाधी स्थळाला भेट दिली. 23 जानेवारी1664ला  याच परिसरात राजांचा घोड्यावरुन पडून अपघात झाला. इथेच महानिर्वाण झाले . आज फक्त एकवीस गुंठे जागेत गावाबाहेरच्या माळावर राजांची अत्यंत छोटी एकाकी  समाधी दिसते. एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या शेतातली आई-वडिलांची समाधी सुद्धा यापेक्षा खूप चांगली असते हो!मल्लेश राव सारख्या मंडळीनी दावणगिरी मध्ये शहाजीराजे स्मारक समिती स्थापन केली आहे. तिथून ऐंशी किलोमीटर अंतरावरून ही मंडळी महिन्या-दोन महिन्यातून अधेमध्ये इथे येतात . छोटे व्यवसाय करणारी, मराठी भाषा न  जाणणारी ही   महाराष्ट्रीयन मंडळी तिकडे  शहाजीसेवा करायचा प्रयत्न करतात. परंतु त्यांची ताकद खूप  छोटी  आहे. " जय शिवाजी जय भवानी"अशी  घोषणा  सर्वच राजकीय पक्ष इकडे  देतात. पण  शिवरायांसारख्या सामर्थ्यवान पुरुषाला घडविणाऱ्या त्या महान पित्याकडे महाराष्ट्राने मात्र साफ  दुर्लक्ष केले आहे. गेली चाळीस वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून मी शिवचरित्राचा अभ्यास करतो आहे. दरम्यान मी स्वत: दोनशेहून अधिक गडकिल्ले पाहिले आहेत. सखोल  संशोधन करता  अशी दिसते की,   मराठी इतिहासकारांनी व जाणत्या मंडळींनी मुद्दामच छत्रपती शहाजीराजे यांचा खराखुरा इतिहास , त्यांचं असाधारण  राष्ट्रीय योगदान, तसेच  #शिवराय व त्यांच्या श्रेष्ठ  पित्यामधील मुलखावेगळे नाते हा सारा इतिहास, हया  सत्य कागदोपत्री घटना अगदी जाणीवपूर्वक दृष्टिआड केल्या आहेत..दडपून ठेवल्या आहेत.