Corruption Perception Index: ट्रांसपेरेंसी इंटरनॅशनलने 2024 या संपूर्ण वर्षाचा करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI) जाहीर केला आहे. या अहवालात 180 देशांमध्ये भ्रष्टाचाराचा स्तर तपासून त्यांची रँकिंग करण्यात आली आहे. या यादीत भारत 96व्या स्थानावर, तर पाकिस्तान 135व्या स्थानावर घसरला आहे.
अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. भारतातदेखील अनेक ठिकाणी अधिकाराचा दुरुपयोग करून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी भ्रष्टाचार होतो. तर कित्येक जण सत्तेचा दुरुपयोग करतात. भ्रष्टाचार हा एक अप्रामाणिकपणा किंवा फौजदारी गुन्हा आहे.
करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI) हा एक जागतिक अहवाल आहे, जो प्रत्येक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीचे मोजमाप करतो. देशांना 0 ते 100 या दरम्यान गुण दिले जातात. 100 गुण असलेला देश सर्वात स्वच्छ आणि पारदर्शक, तर 0 गुण असलेला देश सर्वात भ्रष्ट मानला जातो.
यावर्षीच्या अहवालात असे आढळले की, जगभरातील भ्रष्टाचाराची समस्या गंभीर आहे. अनेक देशांचे 50 पेक्षा कमी गुण आहेत. जवळपास 6.8 अब्ज लोक असे देशात राहतात, जिथे भ्रष्टाचाराचा स्तर जास्त आहे.
डेनमार्क हा सलग 7व्या वर्षी सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश ठरला असून त्याला 90 गुण मिळाले आहेत. त्यानंतर फिनलंड (88), सिंगापूर (84), न्यूझीलंड (83), लक्झेंबर्ग (81), नॉर्वे (81) आणि स्वित्झर्लंड (81) हे देश अव्वल स्थानांवर आहेत.
यादीत दक्षिण सुदान (8 गुण) हा सर्वात भ्रष्ट देश ठरला असून तो 180व्या स्थानावर आहे. त्यानंतर सोमालिया (179), व्हेनेझुएला (178), सीरिया (177) आणि येमेन, लिबिया, एरिट्रिया आणि इक्वेटोरियल गिनी (173) आहेत.
भारताची रँकिंग पाकिस्तानपेक्षा खूप चांगली असली तरी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे. शासनाने आणि नागरिकांनी मिळून पारदर्शकता आणि प्रामाणिक कारभारावर भर द्यायला हवा.