'माझं मूल आहे, मी...', बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसवून Reel शूट करणाऱ्या महिलेचं स्पष्टीकरण, 'मी लाईक्स, व्ह्यू साठी काही...'

Viral Video: महिला बाळाला गच्चीच्या कठड्यावर पकडून रील शूट करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पालकत्व, सुरक्षा आणि जबाबदारी यावर भाष्य केलं होतं. महिलेचं कृत्य योग्य आहे का? यावरुनही चर्चा रंगली होती.   

शिवराज यादव | Updated: Feb 11, 2025, 06:55 PM IST
'माझं मूल आहे, मी...', बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसवून Reel शूट करणाऱ्या महिलेचं स्पष्टीकरण, 'मी लाईक्स, व्ह्यू साठी काही...' title=

Viral Video: सोशल मीडियावर सध्या रीलचा जमाना असून, तो शूट करताना एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते हे दर्शवणारा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला. एका महिलेने आपल्या बाळाला गच्चीच्या कठड्यावर पकडून शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि सगळ्यांच्या ह्रदयाचा ठोकाच चुकला. व्हिडीओत महिलेने एका हाताने मोबाईल आणि दुसऱ्या हाताने बाळाला पकडल्याचं दिसत आहे. कॅमेऱ्यात बाळ किती धोकादायक उंचीवर आहे हे स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालकत्व, सुरक्षा आणि जबाबदारी यावर चर्चा रंगली. 

वर्षा यादवंशी असं या महिलेचं नाव असून तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअऱ करताना तिने लिहिलं होतं की, "सर्वांना सुप्रभात. मी एक शूर मुलगा आहे जो जगाला न्याहाळत आहे आणि आईसह विटॅमिन डी घेत आहे".

महिला दिल्लीत वास्तव्यास असून, काही वेळातच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट करत तिला खरीखोटी सुनावलं. हे अत्यंत बेजबाबदार वागणं असून, मुलाचा जीव धोक्यात घातला जात आहे असा संताप अनेकांनी व्यक्त केला आहे. यादरम्यान काहींनी ती आई असून, तिला मुलाच्या सुरक्षेबाबत कल्पना आहे अशी बाजूही घेतली. 

एका युजरने म्हटलं की, "तुम्ही एका रीलसाठी मुलांचा जीव का धोक्यात घालत आहात?" दुसऱ्याने कमेंट केली, "भारत आहे म्हणूनच तुम्ही सुरक्षित आहात, जर तुम्ही यूके किंवा अमेरिकेत असता तर बालसेवेचे लोक येऊन तुमच्या मुलाला घेऊन गेले असते."

तिसऱ्याने म्हटले, "पोलिस, कृपया मुलांची काळजी घ्या... आणि या महिलेला रुग्णालयात दाखल करा." चौथ्या युजरने म्हटल की, "यार कृपया असे व्हिडिओ बनवू नका... ते खूप धोकादायक दिसते. आई असल्याने मला माहित आहे की तुम्ही अजिबात घाबरत नाही कारण तुम्ही त्यावर विश्वास ठेवता. एक आई कोणत्याही परिस्थितीत तिच्या मुलांना कधीही इजा होऊ देऊ शकत नाही. पण कृपया काळजी घ्या, बाळे कधीकधी अप्रत्याशित असतात आणि असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकतात जे मी सांगू इच्छित नाही."

दरम्यान या टीकेनंतर महिलेने व्हिडीओ शेअर करत टीकाकारांना उत्तर दिलं आहे. वादावर भाष्य करताना म्हटलं आहे की, 'हा व्हिडीओ ऐका आणि तथ्य समजून घ्या. जर तुम्ही समजून घेण्यास तयार नसाल तर मला फरक पडत नाही'.

व्हिडीओत ती आपण मुलाला दोन्ही हाताने पकडलं होतं, फक्त शेवटच्या क्षणी मोबाईल काढताना एक हात बाजूला घेतला होता असा दावा केला आहे. घाणेरड्या शिव्या देणाऱ्यांमुळे मला फरक पडत नाही. मी माझ्या बाळाची किती काळजी घेते, प्रेम करते हे मला माहिती आहे. कोणती आई आपल्या बाळाला मारुन टाकेल. माझा कोणताही हेतू नव्हता असं ती म्हणाली आहे. 

"बाईच बाईची शत्रू आहे. याच मिळून एकमेकांना दुखी करत असतात. मला त्यांच्याशी काही बोलायचं नाही. पण जे गांभीर्याने सांगत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडीओ आहे. जर मी चुकली असेल तर माफी मागते. माझा तसा कोणताही हेतू नव्हता. गाण्यामुळे मी तो जाणुनबुजून केला असं वाटत आहे. मी लाईक्स, व्ह्यूसाठी व्हिडीओ केले असं म्हणत आहे त्यांचा गैरसमज झाला आहे. मला इंस्टाग्रामकडून काही पैसे मिळत नाहीत. मला मोलकरीण बोललं जात आहे. मी त्याची आई आहे. मला तुम्ही सांगायची गरज नाही. मला शिव्या दिल्या तर मीदेखील देणार," असंही ती म्हणाली आहे.