HSC Exam: कॉपी पुरवण्यासाठी चढले विजेच्या पोलवर..जीव धोक्यात घालून; बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपींचा सुळसुळाट!

Beed HSC Exam Copy: बीडमध्ये बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 11, 2025, 07:51 PM IST
HSC Exam: कॉपी पुरवण्यासाठी चढले विजेच्या पोलवर..जीव धोक्यात घालून; बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपींचा सुळसुळाट! title=
बीड कॉपी प्रकरण

Beed HSC Exam Copy: राज्यभरात बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्हणजे एक लाख 66 हजार 429 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल विज्ञान शाखेचे 1 लाख 27704 विद्यार्थी आणि कला शाखेचे 47879 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.  कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. दरम्यान बीडमध्ये शिक्षण विभागाच्या सर्व नियमांना हरताळ फासात बारावीच्या पहिल्या पेपरला कॉपी पुरवल्या गेल्या. स्वतःचा जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना कॉप्यांचा पुरवठा करण्यात आला.  

बीडमध्ये बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. शिक्षण विभागाकडून कॉपी रोखण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली. मात्र या सर्व नियमांना हरताळ फासळत बीडमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आली आहे.

आज बारावीचा पहिला पेपर होता. आणि याच पेपर साठी बीड शहरातील बलभीम महाविद्यालयासह इतर परीक्षा केंद्रा बाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र या बंदोबस्ताला न जुमानता अनेकांनी कॉप्या पुरवण्याच्या उद्योग केला आहे. थेट विद्युत रोहित्रा जवळ असलेल्या खांबावर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालत कॉपी पुरवण्यात आली. बीड शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला रोख लावण्याचा प्रयत्न करत चोप दिला आहे.

विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा?

विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जर विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.  जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले आहे, त्यामुळे कॉपी करताना विद्यार्थी पकडल्या गेल्यास त्यांच्या भवितव्यावर हा निर्णय गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो, असे बोर्डाकडून सांगण्यात आलंय. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय रद्द करा अन्यथा त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने व्यक्त केली आहे. चुकीच्या गोष्टीला शिक्षा मिळणे गरजेचे असते. परंतु ती चुक सुधारण्याची संधी न देता अशा प्रकारे भवितव्य अंधारात घालण्याचा आदेश हा निश्वितच अन्याय कारक आहे. असे मनसे ने म्हटले आहे.शिक्षक भारतीनेही या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.आजवरच्या वर्षात किती फौजदारी कारवाया केल्या असा सवाल शिक्षक भारतीने उपस्थित केला, कारवाई करायची तर ज्या केंद्रावर सर्रास कॉपी चालते त्यांच्यावर करा मात्र विद्यार्थ्यांमध्ये ऐन परीक्षेच्या तोंडावर भीती पसरवू नका, त्यांना  निर्भय वातावरणात परीक्षेला सामोरे जाऊ द्या, कॉपी साठी शिक्षण मंडळाची यंत्रणा दोषी राहू शकते, मात्र यंत्रणेचा दोष विद्यार्थ्यांच्या मस्तकी मारू नका असा ईशारा शिक्षक भारतीने दिला आहे.  दरवर्षी राज्यातील अनेक शाळांमध्ये कॉपी बहाद्दरांची झुंबड दिसते, अनेक केंद्रांवर सामुहीक कॉपीचेही प्रकार उघडकीस येतात. त्यामुळे निश्चितच अभ्यासू विद्यार्थ्यांवर परिणाम होतो म्हणून कॉपीमुक्त वातावरण गरजेचे आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश योग्य की अयोग्य यावरून वाद निर्माण झाल्याने शिक्षण मंडळ काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.