पनीर खाताय, सावधान! बाजारात भेसळयुक्त पनीरची विक्री, स्वत: मंत्र्याने केला खुलासा

तुम्ही देखील बाहेरून आणलेले पनीर खाताय. मग आताच व्हा सावध! बाजारात भेसळयुक्त पनीरची विक्री, स्वत: मंत्र्याने केला खुलासा.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 11, 2025, 07:45 PM IST
पनीर खाताय, सावधान! बाजारात भेसळयुक्त पनीरची विक्री, स्वत: मंत्र्याने केला खुलासा title=

हॉटेल किंवा रेस्टॉरंट मधून सर्व्ह केलं जाणार पनीर आपण आवडीने खातो. मात्र, हे पनीर दुधापासून न बनवता वनस्पती तेलापासून बनवलेलं असतं हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच ही माहिती दिलीय. 

पनीर बटर मसाला, पनीर भुना मसाला, पनीर भुर्जी, पनीर पराठा. ही सगळी नावं ऐकली की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारींसाठी तर पनीरचे पदार्थ म्हणजे स्पेशल ट्रिट असते. त्यात पनीर बनतं दुधापासून तेव्हा त्यातून आपल्याला शरीरासाठी फायदेशीर कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स आदी पोषक घटक मिळतील असा समज असतो. पण थांबा. तुमच्या ताटात आलेलं पनीर गाई म्हशीच्या दुधाऐवजी वनस्पती तेल आणि इतर घटकांपासून बनवलेलं असू शकतं.

नाशकातल्या कार्यक्रमात मंत्र्यांचाच खुलासा

नाशिकमध्ये आयोजित कृषी महोत्सवात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच याबद्दलची माहिती दिली. दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल तर वनस्पती तेलापासून बनवलेल्या पनीरऐवजी दुधापासून बनवलेलं पनीर खावं असा आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. 

खरंतर पनीर बनवण्याच्या जगभरात वेगवेगळ्या पद्धती आहेत. आवश्यक निकष बाळगून वनस्पती तेलापासून म्हणजेच पाम तेलापासून बनवलं जाणार पनीरही खाल्लं जातं. मात्र त्यामुळे त्याला आपल्या देशात मान्यताही आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली. मात्र कोणतेही निकष न पाळता बनवलेलं घातक पनीर अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतं. 

भेसळयुक्त पनीरमुळे होऊ शकतात या समस्या

 भेसळयुक्त पनीरमुळे पोटदुखी, अपचन, विषबाधा होण्याची भीती असते. त्वचेवर रॅशेस, डोकेदुखी, टायफॉइडची शक्यता असते. काहींना अल्सर, पित्ताचा त्रास होऊ शकतो. पनीरवर आयोडीनचे थेंब टाकून चाचणी केल्यास पनीरचा रंग निळा झाल्यास पनीर भेसळयुक्त आहे समजायचं आणि रंग न बदलल्यास पनीर दुधापासून बनवलेलं आहे असं समजायचं. 

खरंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे भारतीयांसाठी केवळ पोषक अन्नपदार्थ नाहीत. तर शेतकरी आणि पशुपालन संस्कृतीचा भाग आहेत. त्यामुळे स्वत:चं आरोग्य जपण्यासाठी वनस्पती तेलयुक्त पनीर खाऊ नये असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. मात्र भेसळयुक्त पनीरचं उत्पादन कसं रोखता येईल याची शासन प्रशासन स्तरावर खबरदारीही घेतली जाईल इतकी मंत्रीमहोदयांकडून अपेक्षा.