Expensive Cow In The World : एका गायीची किंमत किती 5 ते 15 लाखांपर्यंत असू शकते. जगात एक गाय आहे ज्याची किंमत 40 कोटी रुपये आहे. ही जगातील सर्वात महागडी गाय असल्याचे म्हटले जाते. या गाईची किंमत जाणून सर्वांनाच धक्का बसतो. ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या या गायीचा भारतातील एका राज्याशी खास संबंध आहे.
ब्राझीलमध्ये गायींच्या लाखो प्रजाती आढळतात. व्हिएटिना 19 नावाच्या गाईने सर्व गाईंचा रेकॉर्ड मोडला आहे. 40 कोटी रुपयाला या गाईची विक्री झाली आहे. सर्वात विक्रमी दराने विक्री झालेल्या या गाईने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे झालेल्या लिलावात ही गाय विकली गेलेली सर्वात महागडी गाय आहे.
या गायीचे वजन 1101 किलो आहे. इतर गायींच्या सरासरी वजनाच्या दुप्पट या गाईचे वजन आहे. व्हिएटिना- 19 ही नेलोर गाय आहे. पांढरा शुभ्र रंग, तुकतुकीत त्वचा, खांद्यावर कुबड आणि डौलदार शरीर असलेली ही गाय दिसायला खूपच आकर्षक आहे. ही गाय फक्त दिसायलाच सुंदर नाहीत तर उष्ण तापमानाशी जुळवून घेण्याची क्षमता देखील या गाईमध्ये आहे.
व्हिएटिना- 19 या गाईने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. टेक्सासमधील फोर्ट वर्थ येथे झालेल्या "चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड" स्पर्धेत "मिस साउथ अमेरिका" हा पुरस्कार या गाईने पटकावला आहे. ही स्पर्धा गायी आणि बैलांसाठीच्या मिस युनिव्हर्ससारखी असते. या स्पर्धेत वेगवेगळ्या देशांतील गायी आणि बैल सहभागी होतात.
ब्राझीलमधील 80 टक्के गायी झेबू प्रजातीच्या आहेत. या गाई भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील नेल्लोर जिल्ह्यातून येतात. या गाई त्यांच्या कुबड्या आणि लटकत्या मानेची कातडीसाठी ओळखल्या जातात. व्हिएटिना 19 ही नेलोर जातीची गाय आहे, ज्याला ओंगोल गाय असेही म्हणतात. गाईची ही प्रजाती भारतातील आहे. 1800 च्या दशकात या गाईचे ब्रीड ब्राझीलमध्ये आणले गेले.