पुण्यातल्या सर्कशीत जिराफ, हत्ती परतले; डिजीटल प्राण्यांचे सर्कशीतले खेळ पाहून पुणेकर आनंदी

Pune News : जिवंत प्राण्यांना पर्याय म्हणून सादर करण्यात आलेला डिजिटल हत्ती पुण्यातील रेम्बो सर्कसचं खास वैशिष्ट्य ठरला आहे. 

पुजा पवार | Updated: Feb 11, 2025, 08:44 PM IST
पुण्यातल्या सर्कशीत जिराफ, हत्ती परतले; डिजीटल प्राण्यांचे सर्कशीतले खेळ पाहून पुणेकर आनंदी title=
(Photo Credit : Social Media)

अरुण मेहेत्रे (प्रतिनिधी) पुणे : सर्वसामान्यपणे बघायला न मिळणारे प्राणी आणि त्यांचे खेळ हे कुठल्याही सर्कशीचं प्रमुख आकर्षण असतं. मात्र आता सर्कशीत प्राण्यांच्या वापरावर बंदी आहे. अशावेळी जिवंत प्राण्यांना पर्याय म्हणून सादर करण्यात आलेला डिजिटल हत्ती पुण्यातील रेम्बो सर्कसचं खास वैशिष्ट्य ठरला आहे. 

सर्कशीमध्ये जिवंत प्राण्यांचा वापर करण्यास आपल्या देशात बंदी आहे. खरंतर पूर्वी हे जिवंत प्राणी सर्कशीच खास आकर्षण असायचे. मात्र आता कायद्याचं पालन करत असतानाच सर्कशीतील गंमत हरवायची नसेल तर डिजिटलचा पर्याय प्रभावी ठरत आहे. रेम्बो सर्कस मध्ये केरळ मधून हा डिजिटल हत्ती मागवण्यात आला आहे. एवढंच नाही तर सर्कशीत गोरिला, झेब्रा, जिराफ या प्राण्यांचे दर्शन झाल्याने प्रेक्षक अगदी भाराउनच गेले. 

रेम्बो सर्कस मधील हा हत्ती बच्चेकंपनींच आकर्षण ठरत आहे. खऱ्याखुऱ्या हत्तीसारखा हुबेहूब दिसणारा असा हा डिजिटल हत्ती असून त्याचं अवाढव्य शरीर, त्याची उंची त्याचं वजन आणि त्याच्या हालचाली सारंकाही अचंबित करणारं आहे. सर्कशीच्या तंबूखाली जेव्हा हत्ती छान खेळ सादर करतो तेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. हा हत्ती तो डावीकडे बघतो, उजवीकडे बघतो, तोंड उंचावून पाण्याचा फवारा देखील मारतो. हा हत्ती खोटा खोटा असला तरी त्याच्या करामती अतिशय मनोरंजक आहेत. त्यामुळे पुण्यातील या डिजिटल सर्कसला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. 

हेही वाचा : Fact Check : क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टीला झाली जुळी मुलं? काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?

 

सर्कसमधील प्राणी गायब झाल्यानंतर प्राण्यांचे पोशाख चढवून मानवी कलाकार प्राण्याचे खेळ सादर करतात. महिला, पुरुष सर्कसपटूंच्या चित्तथरारक कसरती आणि विदूषकांच्या विनोदी करामती सर्कशीचं आकर्षण टिकवून आहेत. असं असलं तरी आजच्या काळात सर्कशीचं अस्तित्व अनेक कारणांनी धोक्यात आलंय. अशा परिस्थितीत सर्कस जिवंत ठेवायची असेल तर डिजिटलला पर्याय नाही हेच या निमित्तान अधोरेखित होतं.