Sunetra Pawar Praful Patel Rajya Sabha: राजधानी दिल्लीत संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार आज राज्यसभेत सभापतींच्या खुर्चीवर होत्या. तालिका सभापतीपदी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान आज राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल बोलण्यासाठी उभे राहिले होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी त्यांना वेळ संपल्यानंतर आठवण करुन दिली. पण यानंतरही प्रफुल्ल पटेल थांबले नाही. त्यांच्यात आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थसंकल्पावर चर्चा केली जात आहे. त्यातच आज तालिका सभापती म्हणजेच पीठासीन सभापतीपदी सुनेत्रा पवार विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. नुकतीच त्यांची राज्यसभेच्या तालिका सभापतीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान पीठासीन सभापती सुनेत्रा पवार असताना राष्ट्रवादीचेच खासदार प्रफुल्ल पेटल अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी उभे राहिले होते.
दरम्यान खासदार प्रफुल्ल पटेल भाषण करत असताना त्यांची वेळमर्यादा संपल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्यांना तुमची वेळ संपली आहे अशी आठवण करुन दिली. पण त्यानंतरही ते थांबले नाहीत. दुसरीकडे विरोधकही वेळ संपल्याची आठवण करुन देऊ लागले होते. त्यावर त्यांनी आमच्याकडे वेळच वेळ आहे, भाजपकडून मला मिळाला आहे, असा टोला लगावला.
प्रफुल्ल पटेल विरोधकांकडे इशारा करत म्हणाले की, "इकडे वेळ आहे (भाजपकडे हात करून ) यांच्याकडे वेळच वेळ आहे, तुमचा वेळ संपला आहे". पुढे ते म्हणाले, "भारताचा प्रवास सुहाना सफर आहे आणि त्यासाठी नेतृत्वही दमदार हवं. मोदींच्या रुपात ते नेतृत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे तुम्हीही (विरोधकांना) सर्वांच्या प्रयत्नात सामील झालात तर देश पुढे जाईल आणि तुम्हालाही देशासाठी काहीतरी योगदान दिल्याबद्दल बरं वाटेल".
यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी हात जोडून आपलं निवेदन संपवलं. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाचे राज्यसभेत सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोनच खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत फक्त सुनील तटकरे निवडून आले होते. सुनिल तटकरे सध्या लोकसभेत राष्ट्रवादीचं प्रतिनिधीत्त्व करत आहेत. तसंच सुनेत्रा पवार यांची पीठासीन सभापतीपदी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.