दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. मात्र या चित्रपटातील काजोलच्या पात्राला ज्याप्रकारे दर्शवण्यात आलं होतं, त्यावरुन त्याला टीकेचा सामना करावा लागला होता. करण जोहरने नुकतंच एका मुलाखतीत आपण चित्रपटाचा सामाजिक प्रभाव किती असेल याचा अजिबात विचार केला नव्हता अशी कबुली दिली आहे. तसंच वडील यश जोहर यांचे सलग पाच चित्रपट फ्लॉप गेल्याने खचले होते, त्यामुळे एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणं हे एकमेक लक्ष्य होतं असंही सांगितलं आहे.
लिली सिंगच्या पॉडकास्टवर बोलताना करण जोहरने सांगितलं की, "मला फक्त एक मोठा हिट चित्रपट बनवायचा होता. जेव्हा मी कुछ कुछ होता है लिहिला तेव्हा फक्त 24 वर्षाचा होतो. एका निर्मात्याचा मुलगा असल्याने मला बॉक्स ऑफिसच्या बिझनेसची आणि देशात किती वेगवेगळे प्रेक्षक आहेत याची चांगली समज होती".
आपल्या वडिलांच्या सततच्या अपयशावर बोलताना त्याने सांगितलं की, वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी एक हिट चित्रपट देणं ही एकमेव प्रेरणा होती. "माझ्या वडिलांवर अनेकांचं प्रेम होतं. पण ते एक निर्माते होते ज्यांनी एकामागून एक अनेक फ्लॉप चित्रपट दिले. त्यांचे सलग पाच चित्रपट अपयशी ठरले. मला फक्त एक मोठा हिट चित्रपट तयार करायचा होता. मी समाजात योगदान देऊ शकेल, काही बदल घडवेल किंवा आपली छाप पाडेल असा चित्रपट तयार करण्याचा अजिबात विचार करत नव्हतो. आणि मला हे भौतिक कारणासाठी नाही तर प्रतिष्ठेच्या कारणासाठी आणि माझ्या वडिलांना त्यांचे नैतिक परत मिळवून देण्यासाठी करायचे होते," असं करण जोहर म्हणाला.
पण आपण जेव्हा चित्रपट पाहतो तेव्हा काही सीन पाहिल्यानंतर फार कचरतो असं मान्य केलं आहे. "जेव्हा मी माझा पहिला चित्रपट पाहतो, तेव्हा त्याला प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं ते पाहून फार अभिमान वाटतो. पण त्यातील लैंगिक भेदावरही मी प्रश्न उपस्थित करतो. त्यातील काही डायलॉग आणि अजब वाटणारे क्षण, ते मी आता पाहिले तर मनात येतं 'मी तेव्हा काय विचार करत होतो?' मी तेव्हा सिनेमात नवा होतो. मला चूका करण्याची मुभा होती," असं करणने सांगितलं. यावेळी त्याने कशाप्रकारे शबाना आझमी यांनी आपल्याला फोन करुन लैंगिक राजकारणावरुन झापलं होतं याची आठवण सांगितली.
शाहरुख खानने निभावलेल्या पात्राचा ढोंगी असा उल्लेख करताना करण जोहरने सांगितलं की, "मी डायलॉग लिहित असल्याने ते पात्र माझ्यातूनच आलं होतं. तो एका हॉट मुलीच्या प्रेमात पडला आणि जेव्हा त्याला न आवडणारी मुलगी हॉट झाली तेव्हा तो तिच्या प्रेमात पडतो. तो फक्त चांगल्या दिसणाऱ्या मुली शोधत होता का? हे सगळं माझंच लिखाण होतं. आपण एका प्रकारची विचारसरणी दाखवत आहोत हे तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही. मला फक्त ब्लॉकबस्टर चित्रपट करायचा होता" .
प्रत्येकाचीच ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याची इच्छा असते हे मान्य करताना करण जोहरने आता आपण चित्रपटांमध्ये अर्थ लागतील अशा गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. यासाठी त्याने आपला अखेरचा दिग्दर्शित चित्रपट 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'चं उदाहरण दिलं. आपण कशाप्रकारे त्यात काही विचारसरणी दाखवत आहोत हे त्याने सांगितलं. "वर्षं जातात त्याप्रमाणे तुम्ही जसे होऊ इच्छिता तसे होत जाता. तुमचे विचार, विचारसरणी कामात दिसली पाहिजे. खासकरुन जेव्हा तुमची पात्रं आजच्या जगातील असतात. मला खूप काही बोलायचं होतं, ते मी रॉकी और राणी च्या माध्यमातून व्यक्त केलं आहे," असं तो म्हणाला.