महाराष्ट्रातील उर्दू शाळांमध्ये महिला शिक्षकांसह धक्कादायक कृत्य; 22 शाळांचा अल्पसंख्यांक दर्जा काढण्याचे आदेश

अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळांमधील गैरकारभार, भ्रष्टाचार व महिला शिक्षकांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी पोलीस व शिक्षण विभागाला दिले आहेत.

वनिता कांबळे | Updated: Feb 11, 2025, 09:17 PM IST
महाराष्ट्रातील उर्दू शाळांमध्ये महिला शिक्षकांसह धक्कादायक कृत्य;  22 शाळांचा अल्पसंख्यांक दर्जा काढण्याचे आदेश  title=

Urdu Medium Schools in Maharashtra :  महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अकोल्यातील उर्दू शाळांवर धाड टाकली. संस्था चालक अत्याचार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप महिला शिक्षिकांनी केला होता. त्यामुळे शाळांवर हे धाडसत्र सुरु आहे. पातूर येथील उर्दू शाळेतील महिला शिक्षकांचा लैंगिक छळ व गैरकारभार प्रकरणी शाळा संचालकावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच  22 शाळांचा अल्पसंख्यांक दर्जा काढून घेण्याचे निर्देशही अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी दिले आहेत. 

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी अकोला जिल्ह्यातील शासन अनुदानित उर्दू शाळांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील पातुर येथे अलहाज सलीम जकरिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकाकडून महिला शिक्षकांना मारहाण व लैंगिक छळाच्या तक्रारी अल्पसंख्यांक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्यारे खान यांनी या शाळांना भेटी देत वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर व पोलीस उप अधिक्षक गजानन पडघन यांच्यासह अल्पसंख्यांक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. अकोल्याचे पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी अकोला विश्रामगृह येथे प्यारे खान यांनी भेट घेत वस्तुस्थिती जाणून घेतली.

पिडित महिला शिक्षकांनी प्यारे खान यांच्यासमोर शाळेचे संचालक सैय्यद कमरुद्दीन यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. शाळा संचालक सैय्यद कमरुद्दीन हे बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण करत असल्याचा खळबळजनक आरोप यावेळी महिला शिक्षिकांनी केला. यावेळी त्यांनी प्यारे खान यांच्यासमोर पुरावे सादर केले. शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी 40 लाख रुपये रोख मागणे, नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पगारातून 30 ते 40 टक्के रक्कम जबरदस्तीने वसूल करणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी यावेळी शिक्षकांनी केल्या. सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या सेवानिवृत्ती वेतनातूनही जबरदस्ती मोठी रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी यावेळी अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी केल्या आहेत.

शाळा संचालक कमरुद्दीन यांच्या विरोधात विविध 45 गंभीर गुन्हांची नोंद आहे. यात कलम 376 (बलात्कार) अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे देखील आहेत. शिवाय याच्याविरुद्ध हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मकोका व एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना विनंती करणार असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सध्या राज्यातील सरकार अनुदानित उर्दू शाळांंच्या गैरकारभारा विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. राज्याभरातील सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन ते अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या शाळांच्या स्थितीचा आढावा घेत आहेत. आज प्यारे खान यांनी अकोला जिल्ह्यातील पातुरमधल्या उर्दू शाळांना भेटी दिल्या. अकोला जिल्ह्यातील पातूरचे  संस्थाचालक सय्यद कमरोद्दीन यांच्या विविध शाळांसदर्भात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. जिल्हाभरात त्यांच्या 22 अनुदानित शाळा आहेत. या शाळांमध्ये सर्रासपणे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकाकडून मारहाण आणि लैंगिक छळाच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

या संपूर्ण गंभीर प्रकरणात पोलीस कारवाई करण्याचे आदेश अल्पसंख्यांक आयोगाने अकोला पोलिसांना दिले आहेत. तर लवकरच चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील उर्दू शाळांच्या माध्यमातून सरकारला हजारो कोटींचा चुना लावला जात असल्याचा आरोप प्यारे खान यांनी केला आहे. अल्पसंख्यांक समाजातील जागरुक नागरीक, स्वयंसेवी संस्था व पिडीत शिक्षकांनी अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडे संपर्क साधावा असे आवाहन प्यारे जिया खान यांनी केले आहे.