अलिबागजवळ आहे महाष्ट्रातील रहस्यमयी किल्ला; जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट, मुरुड जंजीऱ्यापेक्षा भारी

Kolaba Fort : जलदुर्ग आणि भूईकोट किल्ला एकाचवेळी पहायचा असेल तर महाराष्ट्रातील या अनोख्या किल्ल्याला नक्की भेट द्या. अलिबागजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 11, 2025, 11:53 PM IST
अलिबागजवळ आहे महाष्ट्रातील रहस्यमयी किल्ला; जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट,  मुरुड जंजीऱ्यापेक्षा भारी title=

Chhatrapati Shivaji Maharaj Forts, Kolaba Fort :  महाराष्ट्रात एक अनोखा किल्ला आहे जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. अलिबागजवळच्या समुद्रात हा किल्ला आहे. सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी महाराजांनी हा किल्ला उभारला. हा किल्ला मुरुड जंजीरा किल्ल्याला टक्कर देतो.   

अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर हा किल्ला आहे.  कुलाबा किल्ला  असे याचे नाव आहे. हा  किल्ला मिश्रदुर्ग प्रकारातील आहे. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढलेला असतो. यामुळे हा किल्ला जलदुर्ग बनतो. तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते. यामुळे हा  किल्ला भूइकोट बनतो. हा किल्ला एका मोठ्या खडकावर उभारण्यात आला आहे.हा खडक दक्षिणोत्तर दिशेला 267 मीटर तर पूर्व पश्चिम दिशेला 109  मीटर लांब आहे.

अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत होते. यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले. तर, काही ठिकाणचे जुने किल्ले बळकट केले. 1680 दरम्यानस महाराजांनी कुलाबा किल्ला बांधायला सुरुवात केली. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्रबिंदू होता. 

किल्ल्याचे प्रवेशद्वार किनार्‍याच्या बाजूस पण, इशान्येकडे वळवलेले आहे. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत. याची झलक या किल्ल्यात पहायला मिळते.  हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो अशी याची रचना आहे. यामुळे लाटांचा या किल्ल्यावर परिणाम होत नाही. 

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत. दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर आहे.  त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष पहायला मिळतात.

जायचे कसे?

मुंबईहून  पनवेल - वडखळ मार्गे  अलिबागला जाता येते.  अलिबागच्या समुद्र किनार्‍यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते. मुंबईहून बोटीने मांडव्याला जाता येते. यानंतर अलिबाग एसटी  स्थानकातून किनार्‍यावर जाण्यासाठी रिक्षा मिळतात.