अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दरात कपात; नव्या आर्थिक वर्षापासून सामान्यांना खास भेट, पाहा किती पैसे वाचणार...

Mahavitaran Bill : अरे व्वा! उन्हाळा सुरु झाला की अनेकांचीच डोकेदुखी वाढवतं ते म्हणजे वीजबिल. सततची एसी, अतिशय वेगानं चालणारा पंखा या साऱ्यामुळं बिलाचा आकडाच अनेकांना घाम फोडतो...   

सायली पाटील | Updated: Feb 12, 2025, 09:21 AM IST
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दरात कपात; नव्या आर्थिक वर्षापासून सामान्यांना खास भेट, पाहा किती पैसे वाचणार...  title=
mahavitaran to lower electricity bill from 1 april onwards

Mahavitaran Electricity Bill : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर आता सामान्यांना आणखी एक दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत आहेत आणि यामागं कारण ठरेल ते म्हणजे वीजदरातील कपात.  

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणने (MSCB) पहिल्यांदाच घरगुती वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळं राज्यातील नागरिकांना लवकरच वीज कमी दरात मोठा दिलासा मिळणार हे जवळपास निश्चित दिसत आहे. (Electricity Rates) 

महावितरणं दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक सवलत देण्याचा प्रस्ताव मांडला असून, नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2025 पासून लागू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यात सौर ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे वीजबिलातील ही घट शक्य होत असून सामान्यांना या प्रस्ताव आणि निर्मयाचा फायदा होताना दिसणार आहे. 

किती फरकानं कमी होणार वीजदर? 

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यापासून वीज दरात प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपया इतकी कपात होऊ शकते. इतकंच नव्हे, तर 2025-26 ते 2029-30 या पाच वर्षांच्या कालावधीत वीज दरात साधारण 12 ते 13 टक्क्यांची घटही अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं सामान्यांना हा एक मोठा दिलासा ठरणार असून, ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतच ही प्राथमिक घट होत असल्यामुळं यंदा वीजबिल नागरिकांना घाम फोडणार नाही असंच म्हणावं लागेल. 

हेसुद्धा वाचा : नवी मुंबईत दुचाकीस्वाराला हेल्मेटने मारहाण करुन हत्या करणाऱ्या दुक्कलीपैकी एका आरोपीला अटक  

कसं आहे दर कपातीचं गणित? 

महावितरणच्या माहितीनुसार 100 हून कमी युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात 5.14 रुपयांवरून 2.20 रुपयांची घट लागू होऊ शकते. तर, 101-300 युनिटदरम्यान वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीचे दर प्रति युनिट 11.60 रुपयांवरून 9.30 रुपयांपर्यंत खाली येणार आहेत.