ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : आकडेवारीनुसार, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी शाळांची संख्या कमी होत चालली आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंदी शाळांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे.
हिंदी माध्यमांच्या तुलनेत पालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी असल्याचे चित्र आहे. मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत यू डायसच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. हिंदी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या सर्वाधिक असून त्यानंतर उर्दू माध्यमाच्या शाळांची तर तिसऱ्या क्रमांकावर इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या चौथ्या क्रमांकावर असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील अनेक विद्यार्थी हे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत आहेत.
हिंदी | 67,417 |
उर्दू | 64,319 |
इंग्रजी | 38,884 |
मराठी | 33,739 |
एकीकडे पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभाग विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. डिजिटल शाळा, आनंददायी शिक्षण प्रक्रिया, ई- लर्निंग यांसह विविध गोष्टींवर भर दिला जात आहे. शाळांमध्ये माध्यान्ह जेवणासह विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. पण त्याचा म्हणावा तेवढा उपयोग होताना दिसत नाही.