Job News : नोकरीच्या ठिकाणी कार्यालयीन आठवडा 90 तासांचा असण्याविषयीचं वक्तव्य असो, पत्नीला पाहत राहण्याचं वक्तव्य असो किंवा आणखी काही L&T अर्थात लार्सन अँड टुब्रोच्या अध्यक्षपदी असणाऱ्या एस.एन. सुब्रमण्यन यांनी पुन्हा एकदा आणखी एका वक्तव्यासह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कामाचं ठिकाण बदलण्यापासून नोकरीवर जाण्याच्या इच्छेपर्यंतच्या मुद्द्यांवर त्यांनी वक्तव्य करत आणखी एका वादावा वाचा फोडली. सीआयआय साउथ ग्लोबल लिंकेज शिखर संमेलनामध्ये उपस्थिती लावली असता त्यांनी हे वक्तव्य केलं, जिथं त्यांनी भारतात श्रमिक वर्ग नोकरीसाठी पुढाकार घ्यायला संकोचतो आणि यामुळं उद्योगक्षेत्पात अनेक आव्हानं निर्माण होतात. या श्रमित वर्गामध्ये तांत्रिक विशेषज्ञांचाही समावेश असल्याचं ते म्हणाले.
सध्या बांधकाम क्षेत्रामध्ये श्रमिक किंवा कामगारांची कमतरता भासत आहे. कारण, मूळ गावापासून दूरच्या ठिकाणी न जाण्याची त्यांची भूमिका आणि नजीकच्या ठिकाणाला दिलं जाणारं प्राधान्य. सध्या श्रमिकांना त्यांच्या वाट्याला येणाऱ्या संधीसाठी पुढेच यायचं नाहीय. त्यांची स्थानिक अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी करत असेल, त्यांना आर्थिक हातभार लाभत असेल किंवा हे सर्व सरकारी योजनांमुळेही होत असावं, असं ते म्हणाले. भारतात श्रमिक, कामगारांची कमतरता भासण्याचा थेट परिणाम देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर होईल असंही त्यांनी यावेळी सुचवलं.
L&T मध्ये जवळपास 4 लाख मजूर काम करतात असं सांगत नोकरकपातीमुळं कंपनीला दर वर्षी जवळपास 16 लाख नव्या श्रमिकांची सोय करावी लागते अशी माहिती त्यांनी दिली. मजुरांना कामावर नेमण्याची पारंपरिक प्रक्रिया आता मागे पडली असून, यामध्ये डिजिटल माध्यमं महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
L&T मध्ये मानव संसाधन आणि तत्सम मुद्द्यांच्या कार्यवाहीसाठी HR विभाग असल्याचं सांगत जनधन बँक खाती, प्रत्यक्ष आर्थिक लाभ हस्तांतरण, मनरेगा, गरीब कल्याण योजना श्रमिकांच्या कामाप्रतीच्या घटत्या स्वारस्यास कारणीभूत ठरवल्या आहेत. अनेकदा तुम्ही काही तांत्रिक कामं करणाऱ्या व्यक्तींना ऑफिसला यायला सांगितलं तर ते नोकरी सोडतात. फक्त बांधकाम क्षेत्रातच नव्हे, तर इंजिनीअरिंग क्षेत्रापर्यंत सध्या हीच समस्या पाहायला मिळत आहे.
आपण ज्यावेळी L&T मध्ये काम सुरु केलं तेव्हा तुम्ही चेन्नईचे असाल तर तुम्ही दिल्लीत जाऊन काम करा असं वरिष्ठांनी सांगितल्याचं सुब्रमण्यन म्हणाले. ‘आज मी चेन्नईच्या एखाद्या मुलाला आणलं आणि त्याला दिल्लीत जाऊन काम करायला सांगितलं तर, तो नोकरीच सोडतो. आयटी क्षेत्रात नोकरीचं ठिकाण बदलण्याप्रतीचा एकंदर नकारात्मक दृष्टीकोन अधिकच स्पष्ट असून, इथं कर्मचारी ऑफिसमध्ये येण्याऐवजी दुरून काम करण्यालाच पसंती देतात’ असं ते म्हणाले.