देशभक्त होण्यासाठी विदेशातील आणि विशेषत: शेजारील देशातील लोकांशी वैर बाळगण्याची गरज नाही हे एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे. खरा देशभक्त तो असतो जो नि:स्वार्थी असतो, जो आपल्या देशासाठी समर्पित असतो आणि मनाने चांगला असल्याशिवाय तो होऊ शकत नाही असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे. देशातील कंपन्या, संस्था किंवा व्यक्तीला आपल्या शेजारी देश पाकिस्तानमधील कोणत्याही कलाकार, कंपन्यांसोबत काम करण्यासाठी किंवा त्यांची सेवा घेण्यापासून रोखलं जावं यासाठी बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका फेटाळताना मुंबई हायकोर्टाने हे सांगितलं. याचिकेतून केंद्र सरकारला पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश घालण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि फिरदोश पुनीवाला यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. फैज अन्वर कुरेशी यांनी ही याचिका दाखल केली होती.
अशा प्रकारची बंदी करण्याची मागणी करणारी याचिका सांस्कृतिक सौहार्द, एकता आणि शांतता वाढवण्याविरोधात असून फार चुकीचं आहे असं खंडपीठाने यावेळी सांगितलं. याचिकाकर्त्याने धोरण तयार करण्याबाबत दिलासा मागितला होता आणि न्यायालय विधीमंडळाला विशिष्ट पद्धतीने ते तयार करण्याचे निर्देश देऊ शकत नाही, असंही खंडपीठाने स्पष्ट केलं.
मुंबई हायकोर्टाने यावेळी पाकिस्तानी क्रिकेट संघ वर्ल्डकपसाठी भारतात असल्याचंही उदाहरण दिलं. घटनेच्या कलम 51 नुसार शांतता आणि सौहार्दाच्या हितासाठी केंद्र सरकारने उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात सध्या सुरु असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेत असल्याचं खंडपीठाने निदर्शनास आणून दिलं. जर या याचिकेचा विचार करण्यात आला तर केंद्र सरकारने उचललेल्या सकारात्मक पावलांना अर्थ उरणार नाही असं खंडपीठाने नमूद केले.
याचिकाकर्ता फैज कुरेशी यांनी याचिकेत पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही केली होती. तसंच बंदीचा नियम न पाळल्यास कठोर दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक कारवाई गृहमंत्रालयाने करावी अशी मागणी करण्यास आलो हीत. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही मागितले होते.
फैज कुरेश यांच्या वकिलाने ते खरे देशभक्त असल्यानेच ही मागणी करत असल्याचं सांगितलं. जर बंदी घातली नाही तर भारतीय कलाकारांवर अन्याय होईल असा दावाही करण्यात आला. पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात खेळण्याची परवानगी दिल्याचा इतर ठिकाणी गैरफायदा घेतला जाऊ शकतो आणि भारतीय कलाकारांच्या हातून संधी जातील असाही दावा करण्यात आला. पण खंडपीठाने त्यांचे सर्व दावे निरर्थक ठरवत याचिका फेटाळून लावली.
खंडपीठाने असेही नमूद केले की, मनाने चांगली असलेली व्यक्ती आपल्या देशात कला, संगीत, क्रीडा, संस्कृती, नृत्य इत्यादींच्या माध्यमातून शांतता, सौहार्द वाढवणाऱ्या कोणत्याही उपक्रमाचं स्वागत करेल.