Rohit Sharma, IPL Player Trades Rules: येत्या 22 तारखेपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. या आयपीएलपूर्वी अनेक मोठे बदल पहायला मिळाले. यामध्ये ट्रेड विंडोमधून एक मोठा बदल करण्यात आला. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने ट्रेड विंडोमार्फत खरेदी केलं. याशिवाय रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधार बनवण्यात आलंय. अशातच आता गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून दुसऱ्या टीममध्ये जाणार अशी चर्चा आहे. यामध्येच माजी खेळाडू अंबाती रायडूच्या विधानाने भर घातली.
टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) क्रिकेटपटू अंबाती रायडूने मोठं वक्तव्य केलंय. रोहित आणखी 5-6 वर्षे आरामात आयपीएल खेळू शकेल, असं त्याचं म्हणणं आहे. यावेळी धोनीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपदही सांभाळू शकतो, असं विधान रायडूने केलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा चेन्नईमध्ये जाणार का अशी चर्चा सुरुये.
सध्याच्या सिझनमध्ये म्हणजे आयपीएल 2024 साठी रोहितला टीममध्ये बदल करणं अशक्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आता आयपीएल ट्रान्सफर विंडो बंद झाली आहे. याचाच अर्थ आता कोणत्याही खेळाडूचं ट्रेडिंग करता येणार नाही. ज्यावेळी एखादा खेळाडू टीम सोडून दुसऱ्या फ्रेंचायझीकडे ट्रान्सफर विंडोमध्ये जातो त्यावेळी त्याला ट्रेडिंग म्हणतात. हे दोन पद्धतीने होतं. यामध्ये पहिला सौदा कॅशने होतो, म्हणजेच खेळाडूला विकणाऱ्या फ्रँचायझीला पैसे मिळतात. दुसरे म्हणजे, दोन फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंची देवाणघेवाण करतात.
नियमांनुसार, ट्रेंडिंग विंडो आयपीएल सिझन संपल्यानंतर एक महिन्यानंतर खुली होते. पुढील सिझनच्या लिलावाच्या एक आठवड्यापूर्वी ती खुले असते. ही विंडो लिलावानंतर पुन्हा उघडते. ही विंडो पुढील आयपीएल हंगाम सुरू होण्याच्या एक महिना आधी बंद होते. यंदाच्या आयपीएलची ट्रेडिंग विंडो गेल्या वर्षी 12 डिसेंबरपर्यंत खुली होती. तर 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये लिलाव झाला. ही विंडो 20 डिसेंबरपासून पुन्हा उघडली, जी आयपीएल 2024 हंगाम सुरू होण्याच्या एक महिना आधी बंद करण्यात आली होती. म्हणजेच आता ट्रान्सफर विंडो अजूनही बंद आहे.