IND VS NZ: चेतेश्वर पुजाराच्या करियरवर येणार गदा?

एकेकाळी भारताची वॉल म्हटला जाणारा चेतेश्वर पुजारा आता खराब फॉर्मशी झगडत आहे.

Updated: Dec 1, 2021, 08:00 AM IST
IND VS NZ: चेतेश्वर पुजाराच्या करियरवर येणार गदा? title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघासोबत खेळणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतु टीम इंडियामध्ये स्थान मिळवणं तितकं सोपं नाही आणि त्याहूनही कठीण काम म्हणजे संघातील मिळालेलं स्थान टिकवून ठेवणं. एकेकाळी भारताची वॉल म्हटला जाणारा चेतेश्वर पुजारा आता खराब फॉर्मशी झगडत आहे. बऱ्याच काळापासून पुजाराला चांगला असा खेळ करता आलेला नाही. अशा परिस्थितीत त्याची जागा घेण्यासाठी अनेक तरुण खेळाडू सज्ज झाले आहेत.

पुजारा आऊट ऑफ फॉर्म

चेतेश्वर पुजारा बऱ्याच दिवसांपासून चांगल्या फॉर्मसाठी झगडतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पुजाराला त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्याने पहिल्या डावात 26 तर दुसऱ्या डावात केवळ 22 धावा केल्या. 

चेतेश्वर पुजाराला 2019 सालापासून कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही. भारतीय निवड समितीने त्याला अनेक संधी दिल्या आहेत. भारताकडून खेळताना पुजाराने 91 कसोटी सामन्यांमध्ये 6542 धावा केल्या आहेत.

1. श्रेयस अय्यर

न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. त्याला पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. अय्यरने या संधीचे सोनं केलं. किवीजविरुद्ध अय्यरने पहिल्या डावात 105 धावा आणि दुसऱ्या डावात 65 धावा केल्या. 

त्याच्या या कामगिरीमुळे त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचा विचार केला जाऊ शकतो.

2. सूर्यकुमार यादव

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा जखमी केएल राहुलच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण या फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटच्या 77 सामन्यांमध्ये 5326 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका द्विशतकाचा समावेश आहे. सूर्यकुमार त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो.