Nepal Qualified for Asia Cup 2023: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलनंतर (IPL 2023) एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये (Pakistan) ही स्पर्धे रंगणार आहे. पण बीसीसीआयचे सचिव जय शाहा (Jay Shah) यांनी टीम इंडिया पाकिस्तानात खेळणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानात होणार की त्रयस्थ ठिकाणी खेळवली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
स्पर्धेत नव्या टीमची एन्ट्री
एशिया कप स्पर्धेत सध्या पाच संघांची नावं निश्चित झाली आहेत. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगालदेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. यंदा या स्पर्धेत नव्या संघाची एन्ट्री झाली आहे. या संघाचा भारत आणि पाकिस्तानच्या ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.
1984 पासून एशिया कप स्पर्धा खेळवली जात आहे. 2023 मध्ये खेळवली जाणारी स्पर्धा हा सोळावा हंगाम आहे. यंदाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच नेपाळ क्रिकेट संघाने एन्ट्री केली आहे. एशिया स्पर्धेत पात्र ठरत नेपाळ क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. (nepal cricket team qualified for asia cup 2023) एशिया कप स्पर्धेच्या पात्रता फेरीत नेपाळने मंगळवारी युएईचा पराभव करत इतिहास रचला. काठमांडूच्या टीयू क्रिकेट एसीसी प्रीमिअर कपच्या अंतिम फेरीत नेपाळे युएईचा पराभव केला. गेल्या एशिया कप स्पर्धेत युएई सहावा संघ म्हणून खेळला होता.
एशिया कप स्पर्धेसाठी दोन ग्रुप
एशिया कप स्पर्धेसाठी साखळी, सुपर फोर आणि अंतिम फेरी असे मिळून एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. या स्पर्धेत सहा संघांमध्ये दोन ग्रुप करण्यात आले आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश असेल. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये गतविजेत्या श्रीलंकेसह बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ सहभागी होतील.
एशिया कप 2023 रद्द होणार?
एशिया कप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव बीसीसीआयसमोर ठेवला आहे. म्हणजे एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवले जातील. पण हा प्रस्ताव बीसीसीआयने फेटाळून लावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रिड मॉडेलच्या प्रस्तावावर अडून बसलं तर यंदा एशिया कप स्पर्धाच रद्द होऊ शकते. इतकंच नाही तर एशिया कप स्पर्धा रद्द झाली तर त्याच काळात पाच देशांची मल्टी नेशन स्पर्धा भरवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याचंही समोर आलं आहे.