T20 World Cup 2024 : जून 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या (India vs Afghanistan) खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे 16 खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी टी20 क्रिकेटमध्ये कमबॅक केला आहे. 2022 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली एकही टी20 सामना खेळलेले नाहीत. तब्बल 14 महिन्यांनी रोहित-विराटचं पुनरागमन होत असल्याने संघासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली टी20 विश्वचषकात खेळणार नाहीत याची गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा होती. यामागे अनेक कारणंही आहेत. टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माचं नेतृत्व, विराटचा टी20 क्रिकेटमधला स्ट्राईक रेट, युवा खेळाडूंना मिळणारी संधी आणि क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉर्मेटसाठी वेगवेगळ्या खेळाडूंची निवड यामुळे रोहित-विराटची टी20 कारकिर्द जवळपास संपल्याचं बोललं जात होतं. पण बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत या दोघांची निवड करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
टी20 विश्वचषकही खेळणार
रोहित-विराटच्या निवडीने हे दोघंही टी20 विश्वचषक खेळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. इतकंच नाही तर रोहित शर्माच टीम इंडियाचं नेतृत्वही करणार आहे. पण या दोघांच्या पुनरागमनामुळे काही युवा खेळाडूंचं संघातील स्थान धोक्यात आलं आहे. टी0 विश्वचषकातून या खेळाडूंची सुट्टी जवळपास निश्चित मानली जात आहे.
केएल राहुल
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये केएल राहुलने (KL Rahul) फलंदाज आणि विकेटकिपर म्हणून दमदार कामगिरी केली. अनेक सामन्यात केएल राहुलने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. पण त्याचबरोबर त्याच्या धीम्या खेळीवरही टीका झाली आहे. टी20 क्रिकेटमध्येही केएल राहुलचा स्ट्राईक रेट भलताच कमी आहे. त्यातच अफगाणिस्ताविरुद्धच्या टी20 मालिकेतलही केएल राहुलला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे टी20 विश्वचषकात केएलला संधी मिळण्याची शक्यता जवळपास कमीच आहे. पण अफगाणिस्तान आणि आयपीएलमध्ये संजू सॅमसन आणि जितेश शर्मा फ्लॉप झाल्यास केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे.
ईशान किशन
या यादीत दुसरा नंबर येतो तो म्हणजे ईशान किशनचा (Ishan Kishan). आयसीसी विश्वचषकात भारतीय संघात ईशान किशनला संधी देण्यात आली.पण त्याला केवळ सुरुवातीचा एक सामना खेळवण्यात आला. त्यानंतर तो संपूर्ण स्पर्धा बेंचवर बसून होता. टी20 विश्वचषकातही ईशानचा स्ट्राईक रेट काही खास नाहीए. त्यातच आता सलामीला रोहित आणि मधल्या फळीत विराट आल्याने ईशान किशनचा पत्ता जवळपास साफ झाल्याची शक्यता आहे.
यशस्वी-तिलक आणि रिंकूचा दावा मजबूत
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा आणि रिंकू शर्माची चलती आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत या तिघांनाही भारतीय संघात संधी मिळाली आहे. या मालिकेत आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यास या तिघांचा टी20 विश्वचषकातील समावेश जवळपास निश्चित मानला जातोय. याशिवाय फलंदाजीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंचाही पर्याय आहे.