मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. त्याचा अचानक जाण्याने क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डसोबत अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली.
जेव्हा अँड्र्यू सायमंड्सचा अपघात झाला तेव्हा तो एकटाच होता. अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. मात्र उशीर झाला होता. त्याची प्रकृती गंभीर होती आणि उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.
अँड्र्यू सायमंड्स आधी शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. शेन वॉर्नच्या निधनानंतर सायमंड्सने इन्स्टा पोस्ट केली होती. सगळं काही एका वाईट स्वप्नासारखं वाटतंय मी नि: शब्द आहे असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.
अँड्र्यू सायमंड्सची हीच इन्स्टा पोस्ट शेवटची ठरेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्याच्यावर काळानं घाला घातला. एडम गिलक्रिस्टसह क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सायमंड्सचे करिअर
अँड्र्यू सायमंड्सला जगात महान क्रिकेटर म्हणून ओळखलं जात होतं. ऑस्ट्रेलियाकडून त्याने 26 कसोटी, 198 वन डे आणि 14 टी 20 सामने खेळले होते. त्याने 198 वन डे सामन्यात 1462 केले. तर कसोटीमध्ये 5088 रन केले. टी 20 सामने 337 धावा केल्या. त्याने 39 आयपीएल सामने खेळले. 2003 आणि 2007 मध्ये वर्ल्ड कप देशाला जिंकून देण्यात त्याचा वाटा होता.