मेलबर्न : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी बॉलशी केलेल्या छेडछाडीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. २०१८ या वर्षातला क्रिकेट जगतातला हा सगळ्यात मोठा वाद होता. याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं कर्णधार स्टिव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घातली. या खेळाडूंमधल्या बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची आणि स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली. कॅमरून बॅनक्रॉफ्टवरची ९ महिन्यांची बंदी आता उठणार आहे. ही बंदी उठल्यानंतर बॅनक्रॉफ्टनं या सगळ्या वादावरचं मौन सोडलं आहे.
डेव्हिड वॉर्नरनं मला बॉलची छेडछाड करण्यासाठी उचकवलं. आम्ही त्यावेळी ज्या परिस्थितीमध्ये होतो, त्यामुळे मी बॉलची छेडछाड करायला तयार झालो, असं बॅनक्रॉफ्ट म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टदरम्यान बॅनक्रॉफ्ट सॅण्ड पेपर घेऊन मैदानात उतरला होता. या सॅण्ड पेपरनंच बॅनक्रॉफ्टनं बॉलशी छेडछाड केली.
टीममधल्या माझ्या उपयुक्ततेला मला सिद्ध करायचं होतं. या सगळ्या प्रकरणाला मी पण जबाबदार आहे, कारण त्यावेळी मी जे करतोय ते मला योग्य वाटलं होतं. या चुकीची मी मोठी किंमत चुकवली आहे. माझ्याकडे पर्याय होता, पण मी मोठी चूक केली, असं वक्तव्य बॅनक्रॉफ्ट यानं केलं आहे. झालेल्या प्रकाराबद्दल मला दु:ख झालं. मी टीमचं नुकसान केलं आणि मॅच जिंकण्याची संधी गमावली, अशी प्रतिक्रिया बॅनक्रॉफ्टनं दिली.