दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमातून बाहेर होणारी दिल्ली ही पहिली टीम ठरली आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात खेळवण्यात आलेल्या मॅचमध्ये बंगळुरूनं दिल्लीचा ५ विकेटनं पराभव केला. बंगळुरूच्या या विजयाचे शिल्पकार ठरले एबी डिव्हिलियर्स आणि कर्णधार विराट कोहली. दिल्लीनं ठेवलेल्या १८२ रनचा पाठलाग करताना एबी डिव्हिलियर्सनं ३७ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि ४ फोरचा समावेश होता. तर विराट कोहलीनं ४० बॉलमध्ये ७० रन केले. कोहलीनं ३ सिक्स आणि ७ फोर लगावल्या. दिल्लीनं ठेवलेलं हे आव्हान बंगळुरुनं १९ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. एकीकडे दिल्लीचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरी बंगळुरू मात्र अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे. पण बंगळुरुचं प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होणं हे इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
या मॅचमध्ये विराट कोहलीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. दिल्लीनं २० ओव्हरमध्ये १८१ रन केल्या. ऋषभ पंतनं ३४ बॉलमध्ये ६१ तर अभिषेक शर्मानं १९ बॉलमध्ये ४६ रन केले. बंगळुरुच्या युझवेंद्र चहलनं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर मोईन अली आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.