Mohammed Shami Attacked By Ex Pakistani Cricketer: पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेबरोबरच टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेदरम्यान भारतीय गोलंदाजांबद्दल केलेल्या तर्कहीन विधानांवरुन भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कठोर शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे. शमीच्या या प्रतिक्रियेवर पडसाद उमटत आहेत. खास करुन पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना शमीने केलेली टीका चांगलीच झोंबली आहे. यावरुन एकाने तर थेट शमीला क्रिकेट तुला रडवेल असा इशारा दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने बॉल कुरतडून रिव्हर्स स्वींग केल्याचा दावा इंझमाम-उल-हकने केला होता. याच दाव्यासंदर्भात बोलताना शमीने इंझमाम-उल-हकला शुभांकर मिश्रा या युट्यूबरच्या 'अनप्लग्ड' या कार्यक्रमातील मुलाखतीमध्ये फैलावर घेतलं. 54 वर्षीय इंझमाम-उल-हकने भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यात भारताने बॉल टॅम्परिंगची मदत घेत सामना जिंकल्याचा गंभीर आरोप केला होता. सामन्यातील 14 व्या 15 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगसहीत इतर गोलंदाजांचे चेंडू रिव्हर्स स्वींग होत असल्याच्या मुद्द्यावरुन इंझमाम-उल-हकने टीका केलेली.
इंझमाम-उल-हकने टी-20 वर्ल्डकपमधील ज्या सामन्याच्या संदर्भातून टीका केली त्या सुपर 8 च्या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात रोहितने 40 बॉलमध्ये 92 धावा केल्या होत्या. भारताने या सामन्यात 200 हून अधिक धावा केल्या. मात्र अर्शदीपने तीन विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि भारताने सामना जिंकत स्पर्धेतील आपली अजिंक्य वाटचाल सुरु ठेवली. नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्येही इंझमामने शमी डिजीटल बॉल वापरतो आणि यंत्राच्या मदतीने चेंडू वळवतो असा विचित्र दावा केला होता.
नक्की वाचा >> हार्दिकची अनेक लफडी? नताशाने रंगेहाथ पकडल्यानंतर...; धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
इंझमामने केलेल्या टीकेला उत्तर देताना शमीने, "ते (पाकिस्तानी) आपल्याबद्दल कधीच समाधानी नसतात आणि यापुढेही नसतील. मला वर्ल्ड कपमध्ये वेगळा बॉल देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मी एका मुलाखतीमध्येही हे सांगितलं की मी तो बॉल घरी ठेवला आहे. माझ्याकडे प्लेअर ऑफ द मॅचसाठी दिलेला बॉल आहे. कदाचित एखाद्या दिवशी मी तो बॉल कापून त्यामध्ये मशीन आहे की नाही ते दाखवेन," अशी उपहासात्मक प्रतिक्रिया नोंदवली होती. शमीने "आता त्यांनी अर्शदीप सिंगने चेंडू कसा वळवला यासंदर्भात रंजक प्रतिक्रिया नोंदवली आहे. खरं तर त्यांच्याविरुद्ध जो खेळाडू चांगली कामगिरी करतो त्याला ते लक्ष्य करतात," असं शमी म्हणाला. एवढ्यावरच न थांबता शमीने, "या असल्या कार्टूनगिरीच्या प्रतिक्रिया इतर कुठे तरी द्याव्यात. ते लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत," अशा शब्दांमध्ये शमीने इंझमाम-उल-हक लक्ष्य केलं होतं.
नक्की वाचा >> 'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'
शमीने इंझमामच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतल्यानंतर पाकिस्तानमधील माजी क्रिकेटपटू बाशीत अली यांनी शमीला इशारा दिला आहे. "इंझी भाई काही चुकीचं बोललेत असं तुला वाटलं तर तू ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतोस. उगाच त्यांना कार्टून वगैरे बोलण्याची गरज नाही. ते वरिष्ठ असून त्यांचा थोडा तरी मान ठेवायची तसदी घे. तू त्यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंचा मान ठेवला नाही तर क्रिकेट तुला 365 दिवसांपैकी 300 दिवस रडवले आणि तू केवळ 65 दिवसच समाधानी असशील. त्यामुळे मी तुला विनंती करेन की अशी वक्तव्य करु नकोस. हवं तर ही माझी पर्सनल विनंती आहे असं समज," असं बाशीत अली यांनी युट्यूब चॅनेलवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे.
नक्की वाचा >> मुंबईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! रोहित, सूर्यकुमार सोडणार संघ? IPL 2025 'या' टीमकडून खेळणार?
मोहम्मद शमी हा दुखापतीमुळे मागील काही काळापासून मैदानापासून दूर असून नुकत्याच एका पत्रकार परिषदेमध्ये निवड समितीचा प्रमुख असलेल्या अजित आगरकरने शमी लवकरच पुनरागमन करेल असे संकेत दिलेत. शमी नुकताच बराच काळ मैदानाबाहेर असल्याच्या मुद्द्यावरुनच बाशीत यांनी ही टीका केल्याचं बोललं जात आहे.