मुबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या विराट कोहलीच्या मैदानावरील कामगिरीबद्ध तुम्हाला नक्कीच माहित असेल. जसे की, त्याचे विक्रम, त्याने केलेल्या धावा, जिंकलेले सामने, घेतलेल्या विकेट, त्याची लव्ह स्टोरी वैगेरे वैगेरे.... पण, तुम्हाला त्याच्या संपत्तीबाबत माहिती आहे का? जसे की, त्याची वार्षिक कमाई तो घेत असलेल्या मानधनाची रक्कम आदी गोष्टी. जर तुम्हाला माहित नसेल तर हे वृत्त नक्की वाचा.
विराट कोहली हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याची वार्षिक कमाई ही १६१ कोटींच्या घरात आहे. त्याने विजेता म्हणून घेतलेल्या बक्षिसांसह त्याला मिळणाऱ्या पगाराचा आकडा २७ कोटी रूपयांच्या घरात आहे. त्याला जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न हे १३४ कोटी रूपयांचे आहे. फोर्ब्ज या जगप्रसिद्ध मासिकाने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी बुधवारी प्रसिद्ध केली. या यादीतही विराट कोहलीचा समावेश आहे. ही यादी प्रसिद्ध करतानाच फोर्ब्जने विराटच्या संपत्तीबाबतचा आकडा (१६१ कोटी) जाहीर केला आहे. फोर्ब्जने म्हटल्यानुसार विराटची सर्वाधिक कमाई ही मैदानाबाहेरचीच आहे.
दरम्यान, विराटला मिळणारे सर्वाधिक उत्पन्न हे जाहिरातींमधून आहे. विराटला प्यूमा, पेप्सी, ऑडी आणि ओकले सारख्या बड्या कंपन्यांकडून जाहिराती आणि ब्रँडींगच्या बदल्यात मानधन मिळते.