दुबई : ICC ने एकदिवसीय आणि T20 रँकिंग जाहीर केली आहे. सुपरस्टार फलंदाज विराट कोहली वनडेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानचा फलंदाज पहिल्या क्रमांकावर आहे. (ICC T20 Ranking and ICC ODI Ranking)
आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी कमालीची प्रगती केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन केले आहे. भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. सूर्यकुमारने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 64 धावा केल्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अय्यरने 80 धावा करून भारताच्या 3-0 मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिसर्या सामन्यात ऋषभ पंतनेही अर्धशतक झळकावत 469 गुणांसह 71व्या स्थानावर पोहोचला.
हा पाकिस्तानी फलंदाज पहिल्या क्रमांकावर
भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार आणि फलंदाज बाबर आझम पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
गोलंदाजांच्या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सातव्या स्थानावर कायम आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नऊ विकेट घेणारा प्रसिद्ध कृष्णा 50 स्थानांनी झेप घेत 44व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट वनडे गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर बांगलादेशचा स्टार शाकिब अल हसन अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड अलीकडच्या चांगल्या कामगिरीमुळे गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी अव्वल स्थानावर आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत शम्मीने शानदार खेळी केली. गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत एकही भारतीय पहिल्या 10 मध्ये नाही.