India vs Pakistan: गुरुवारपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान चाहत्यांना उत्सुकता आहे ती, भारत विरूद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याची. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.
यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्धही विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जातेय. यंदाच्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.
एकंदरीत पाहिलं तर भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले गेलेत. त्यापैकी टीम इंडियाने सर्व सात सामने जिंकले आहेत. भारताने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 या सातही वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव केला आहे.
गेल्या वेळी 2019 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 रन्सने (DLS) पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 विकेट्स गमावत 336 रन्स केले होते. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात पाकिस्तानला 40 ओव्हर्समध्ये 302 रन्सचं सुधारित लक्ष्य देण्यात आलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानची टीम 40 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून केवळ 212 रन्स करू शकली. अखेरील भारताने 89 रन्सने (DLS) सामना जिंकला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 134 वनडे सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 56 सामने जिंकलेत. तर पाकिस्तानने भारताविरुद्ध 73 वनडे सामने जिंकले आहेत. गेल्या 10 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला 7 वेळा पराभूत केलंय. तर पाकिस्तानने केवळ 2 सामने जिंकले आहेत. पावसामुळे एक सामना अनिर्णित राहिला.
2017 मध्ये पाकिस्तानने शेवटच्या वनडेत भारताचा पराभव केला होता. हा सामना ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा अंतिम सामना होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 180 रन्सने पराभव केला. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान वर्ल्डकप 2023 मध्ये आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.