पंचकर्म तज्ञ शार्दुल ठाकुर

शार्दुल हा गोलंदाजीतील पंचकर्म तज्ञ आहे असे माझे म्हणणे आहे.

Updated: Mar 26, 2021, 08:10 AM IST
पंचकर्म तज्ञ शार्दुल ठाकुर title=

ब्लॉग, रवि पत्की झी मीडिया, मुंबई: लेखाच्या मथळ्या वरून तुम्हाला वाटेल शार्दुल ठाकूर आयुर्वेदाचार्य आहे की काय ? संघाची बॅटिंग चालू असताना हा पॅविलीअन मध्ये बसून महामंजिष्ठादी काढा तयार करणे आणि बॅटिंग करून परत आलेल्या बॅट्समनला कोट्टणचुक्कादी किंवा कार्पससस्स्यादी तेलाचा अभ्यंग देऊन स्नायू शिथिल करण्याचे काम करतो का काय? तर मित्रांनो तसे काही नाही.शार्दुल हा गोलंदाजीतील पंचकर्म तज्ञ आहे असे माझे म्हणणे आहे. फास्ट बॉलर कडे आउटस्विंग,इनस्विंग,बाऊन्सर,स्लोवर वन आणि यॉर्कर हे विकेट घेण्याचे पाच रामबाण उपाय असतील तर तो गोलंदाजीतला पंचकर्म स्पेशलिस्ट म्हणायला हवा.

शार्दूलचे रणजी ट्रॉफी करिअर जवळून फॉलो करता आले. सुरुवातीला तो क्रिकेटरच्या भाषेत टेलिग्राम आऊटस्विंग टाकत असे.म्हणजे चेंडू हातातून सुटला की त्याच्या मनगटाच्या आणि हातातून सुटलेल्या चेंडूंच्या दिशेवरून तो आउट स्विंग आहे हे बॅट्समनला लगेच कळत असे. 2014-15 च्या रणजी मौसमात त्याने 40 विकेट्स काढून आपले अस्तित्व दाखवून दिले.प्रथम श्रेणीत खूप तावून सुलाखून तो इथपर्यंत पोहचला आहे.25 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय डेब्यु हे योग्य वय होतं. (2017)अगदी 20,21 व्या वर्षी फास्ट बॉलर्स रांगडे असतात(काही वेळेस सणकी) आणि उशिरा संधी मिळाली तर गतीवर तडजोड झालेली असते.

आंतरराष्ट्रीय डेब्यु सामन्यात 10 नंबरचा टी शर्ट घालून (जो सचिनचा शर्ट नंबर होता) त्याने क्रिकेट फॅन्सचा रोष ओढवून घेतला होता.नंतर BCCI ने 10 नंबरचा शर्ट रिटायर केला. 
(मॅराडोनाला श्रद्धांजली म्हणून 10 नंबर टी शर्ट retire करण्यात यावा अशी मागणी देखील फुटबॉल जगात होतीये).आता शार्दुल 54 नंबरचा शर्ट घालतो.

चांगला आऊटसविंग, सिमवरून झपकन आत येणारा इनस्विंग, फलनदाजाच्या हेल्मेटचा वेध घेणारा सरप्राईज बाऊन्सर,चांगला यॉर्कर ह्या बरोबर त्याने तीन प्रकारच्या स्लोवर वन वर प्रभुत्व मिळवले आहे.पहिला लेग कटर स्लोवर वन,दुसरा ऑफ कटर स्लोवर वन आणि तिसरा सिमवर बोटं दुमडून टाकलेला नकल बॉल.विशेष म्हणजे हे तिन्ही चेंडू हातातून सुटल्या सुटल्या ऍक्शन वरून बॅट्समनला समजत नाहीत.दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे ह्या चेंडूवर नियंत्रण चांगले आहे.स्लोवर वन खराब लाईनवर पडत नाहीत किंवा फार कमी फुलटॉस होतात. हवे तेव्हा 140 चा पेस तो टाकू शकतो.कर्णधाराला अजून काय पाहिजे?
त्याच्या पहिल्याच कसोटीत त्याला दुखापत झाल्याने चिंता वाटली होती. इतक्या कष्टाने ध्येय साध्य करायचं आणि नशिबाने अशी थट्टा करायची?सुदैवाने नंतर तो दुखापतीतून बाहेर आला आणि त्याला संधीही मिळाली.

ऑस्ट्रेलियात त्याने बॅटिंग मधली उपयुक्तता दाखवून दिली. तो अतिशय उपयुक बॅट्समन आहे. शालेय क्रिकेट मध्ये त्याने सहा बॉलला सहा षटकार मारले होते हे विसरून चालणार नाही.

सध्या भारताची बेंच स्ट्रेंथ( उपलब्ध खेळाडूंचा साठा)मोठा आहे.खरं तर हा साठा आता इतका मोठा आहे की त्याला बेंच स्ट्रेंथ ऐवजी क्लास रूम स्ट्रेंथ म्हणली पाहिजे.
शार्दुल बेंच वरून मंचावर आलाय आणि अदाकारीने फॅन्सला जिंकून घेतोय.ऑल द बेस्ट शार्दुल.