IND vs PAK Asia Cup: क्रिकेटच्या कोणत्याही स्पर्धेत भारत-पाकिस्तान टिम असेल तर चर्चा या दोघांचीच असते. या दोन्ही टीम या एकमेकांच्या पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे यातील विजय-पराजय हा टिमसोबतच दोन्ही देशांसाठीही महत्वाचा असतो. गल्ली, चौक, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मोठ्या मोठ्या स्क्रिनवर हे सामने सार्वजनिकरित्या पाहिले जातात. तुम्हालादेखील असे सामने पाहण्याचा मोह आवरत नसेल तर थोडं थांबा. कारण यासाठी तुम्हाला आता पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे.
आशिया चषकातील पहिला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पावसामुळे बरोबरीत सुटला. भारताचा एक सामना नेपाळविरुद्ध झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा टिम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा थरार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा सामना पोलिसांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक व्यासपीठावर दाखवला जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर पोलीस आयुक्तालयाने याबाबतची नोटीस शुक्रवारी जारी केली आहे. खासगी, सामाजिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांद्वारे थेट क्रिकेट सामने मोठ्या स्क्रीनवर सार्वजनिकपणे दाखवण्याची व्यवस्था केली जाते. अशावेळी सामन्यादरम्यान अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण होऊन कॅम्पसची शांतता भंग पावते. यामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
जर कोणतीही संस्था क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्याची तयारी करत असेल, तर सामन्याच्या प्रसारणाच्या २४ तास अगोदर पोलीस भवन येथील विशेष शाखेच्या कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल, असे पोलिसांच्या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.
यासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत पोलीस भवनातील एसबी भवन येथे अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळवावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे स्थळ मालक किंवा महापालिकेच्या परवानगीची प्रत, सामना बघायला येणाऱ्यांना प्रवेश विनामूल्य आहे किंवा शुल्क आकारले जात आहे, याचा तपशील द्यावा लागेल. यासोबतच आयोजकांचे नाव आणि मोबाईल क्रमांक आणि कार्यक्रमादरम्यान उपस्थित त्यांच्या प्रतिनिधींची संपूर्ण माहिती भरावी लागले. तसेच आसनक्षमता, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची तपशीलवार माहिती स्त्री-पुरुष, पार्किंग, अग्निशमन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा द्याव्या लागतील, अशी माहिती पोलीस नोटीसमध्ये देण्यात आली आहे.
विशेषत: भारत-पाकिस्तान सामने मोठ्या उत्साहाने पाहिले जातात. या दरम्यान वाद होण्याच्या अनेक तक्रारी येतात, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीलंकेत झालेला भारत आणि पाकिस्तान खेळवला गेलेला आशिया कपमधील तिसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. पावसाने धुंवाधार बॅटिंग केल्याने सामन्यावर पाणी फेरलं गेलं. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. भारताने पाकिस्तानसमोर 267 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी सुरू होण्याआधी पावसाने एन्ट्री केली अन् सामना रद्द करण्याची वेळ आली. सामना रद्द केल्यानंतर दोन्ही संघांना 1-1 अंक देण्यात आला आहे.