हरारे : टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात उद्या सोमवारी 22 ऑगस्ट रोजी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इडियाच्या दोन युवा खेळाडूंचा डेब्यू होणार आहे. या डेब्यू सामन्यात हे दोन खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान टीम इंडियातून डेब्यू करणारे हे खेळाडू कोण आहेत हे जाणून घेऊयात.
झिम्बाब्वे विरूद्धची मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली आहे. अशा स्थितीत तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडिया अनेक खेळाडूंना विश्रांती देणार आहे. या खेळाडूंमध्ये शिखर धवन, इशान किशन, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या जागी इतर खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
IPL 2022 मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. राहुल बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पदार्पणाची वाट पाहत आहे. दुसरीकडे बंगालचा फिरकी अष्टपैलू शाहबाज अहमदला पदार्पणाची संधी मिळू शकते. आयपीएल 2022 मध्ये, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी बॉल आणि बॅट दोन्हीसह चमत्कार केले होते. त्यामुळे या दोघांचा डेब्यू होण्याची शक्यता आहे. याशिवाय तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडलाही अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते.
तिसरा वनडे सामना जिंकून झिम्बाब्वेवर क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा विचार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यावर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान उद्या भारतीय वेळेनुसार 12.45 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे.
तिसऱ्या वनडेसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन - केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, दीपक चहर, कुलदीप यादव, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.